महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही हे लवकरच कळेल – खासदार श्रीकांत शिंदे

मलंगगड परिसरात पहिल्यांदाच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही या भागात घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवलं जात नव्हतं.केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मलंगगड परिसरात ६६ कोटींची कामं करण्यात येणार आहेत. यामध्ये मलंगगड परिसरातील सर्व ५६ गावांमध्ये नळजोडण्या देण्यात येणार असून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. शनिवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जलजीवन मिशनच्या या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं.

याचं कार्यक्रमानंतर खा. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि सांगितले की महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल. महाविकास आघाडीचे नेते दररोज जी वज्रमूठ दाखवण्याचा प्रयत्न करतायत, ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी सुरू आहे. आधी ते आमच्यावर टिका टिप्पणी करत होते, आता एकमेकांवर करायला लागले आहेत.मात्र दुसरीकडे लोकांच्या मनातलं सरकार सध्या आलं असून गेल्या दहा महिन्यात वेगवान निर्णय आणि वेगवेगळ्या पॉलिसी आणण्याचं काम या सरकारने केलंय. गेल्या अडीच वर्षातलं सरकार मात्र सुस्त होतं आणि गेल्या अडीच वर्षात काहीच काम झालं नव्हतं. तेच काम आम्ही गेल्या दहा महिन्यात करून दाखवलं.

अजित दादा तुमच्याकडे येणार आहेत का? असं पत्रकारांनी त्यांना विचारले असता, मी एक छोटा कार्यकर्ता असून तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, यामध्ये मी जास्त बोलू शकत नाही. अजितदादा इकडे जातात, तिकडे जातात, अशा बातम्या मीडियावर दाखवत असून अजित दादांना तरी सांगू द्या ते कुठे जातात, असं म्हणत त्यांनी याबाबत अधिक बोलणं टाळले. त्याचवेळी भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे म्हणाले की, आमच्याकडे कोणीही आलं तरी स्वागतच आहे. यानंतर आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांचा दाखला देत संजय राऊत हे खरोखरच भांडणं लावतात का? असं खासदार शिंदे यांना विचारले यावर मला अशा माणसाबद्दलचे प्रश्न आपण विचारू नयेत, हे मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, असं म्हणत त्यांनी राऊत यांच्यावर याबाबत बोलणे टाळले.