वडेट्टीवारांचा बंद खोलीत निर्णय करू; नाना पटोले यांचा विजय वडेट्टीवार यांच्यावर पलटवार

काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील सुप्त संघर्ष बाहेर येताना दिसत आहे. या दोन्ही नेत्यांत चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पटोले यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही नेत्यांतील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आमच्या सगळ्या नेत्यांनी जिभेवर संयम ठेवावा. त्यामुळे आघाडी मजबूत होईल, असा सल्ला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला. मात्र, त्यांनी वडेट्टीवारांचा बंद खोलीत निर्णय करू म्हणत आगपाखड केली. महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसमधली कुरबुर मंगळवारी अशी चव्हाट्यावर पाहायला मिळाली.

आमच्या सगळ्याच नेत्यांनी जिभेवर संयम ठेवायला हवा. महाविकास आघाडी मजबूत होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आता कुणीही तोडण्याची भाषा करू नये. जोडण्याची भाषा करावी. त्यांनी कुणाचेही नाव न घेता वक्तव्य केले असले तरी त्यांचा रोख काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडेच होता अशी चर्चा आहे.

प्रसारमाध्यमांनी विजय वडेट्टीवारांच्या सल्ल्याबद्दल नाना पटोले यांना विचारले. तेव्हा ते आक्रमक झाले. इतकेच नव्हे, तर वडेट्टीवारांचा बंद खोलीत निर्णय करू. ते एवढे मोठे नाहीत की, त्यासाठी मी इथे उत्तर दिले पाहिजे, अशी आगपाखडही त्यांनी केली.