राज्यातील महाविकास आघाडीचे स्वतःला शिलेदार समजणारे संजय राऊत यांनी आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाही लक्ष्य करायला सुरूवात केलीय. खुद्द शरद पवारांवर लेखणीचा आसूड ओढल्याने त्यांच्यावर राष्ट्रवादीने पलटवार केलाय. काही दिवसापूर्वी त्यांनी अजित पवारांना डिवचले होते. काँग्रेसचे नाना पटोलेंवरही टीका केली. त्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे घेत असताना संजय राऊतांच्या लेखणीमुळे ठाकरे अडचणीत आल्याचं चित्र आहे
राज्यात नव्या सत्ता समीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. यानंतर भाजप आणि शिवसेना यांची २७ वर्षांची जुनी युती तुटली. 2019 निवडणुकांनंतर शिवसेना-भाजप वेगळे होणार हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणार हे स्पष्ट झालं. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीची स्थापना केली. जनतेच्या जनाधाराचा अपमान करून ठाकरेंनी राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा राबविलेला प्रयोग खरं तर हा जनतेचा अपमान होता. २०१४ नंतरही संजय राऊतांनी भाजपवर सामानाच्या माध्यमातून वाटेल ते आरोप करणे भाजप-शिवसेना युती तोडण्यात मोठा सहभाग घेणे, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अस्तित्वात आणणे, शिवसेना पक्ष फुटणे या सर्वाला संजय राऊत जबाबदार आहेत.
राऊत यांनी रोखठोक सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीकेचे बाण डागले आहेत. कोरोनाचा कहर आणि लॉकडाऊनचे निर्बंध कायम असतानाही राऊतांनी भाजप नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. ‘सामना’चे संपादक असलेल्या राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर देताना एकदम खालच्या पातळीची भाषा वापरत होते.
संजय राऊत यांनी त्यांच्याच पक्षाविषयी बोलावं आमच्या पक्षाचं राऊतांनी वकीलपत्र घेऊ नये आम्ही आमचं काय ते बघू असा दम अजित पवारांनी संजय राऊतांना भरला होता. मात्र आता संजय राऊतांमुळे महाविकास आघाडीतच सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. संजय राऊत यांनी ‘सामना’चे अग्रलेख, रोखठोक हे सदर तसंच प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस तसंच काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे.
संजय राऊतांसारख्या नेत्यांची भाषा महाराष्ट्राला शोभते आहे का?
महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे. दिल्लीत मधू दंडवते, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, कॉ. हिरेन मुखर्जी यांनी काँग्रेस सरकारविरोधात जोरदार मोहिमा राबवल्या. अनेक भ्रष्टाचार उघड केले. इंदिरा गांधी, संजय गांधीही त्यातून सुटले नाहीत. महाराष्ट्रात दत्ता पाटील, मृणाल गोरे, केशवराव धोंडगे, कृष्णराव धुळपांपासून गोपीनाथ मुंडेंपर्यंत अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला घाम फोडला,या सर्व नेत्यांची भाषा सुसंस्कृत होती पण संजय राऊतांसारखी विखारी नव्हती.
शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी पण त्यांच्या पक्षाचा शेंडा-बुडखा महाराष्ट्रात त्यांच्या नेत्यांना जे हवे ते म्हणून हा पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरलेत.असं सामना मुखपत्रातून संजय राऊतांनी लिहिलं आहे राष्ट्रवादीत नेतृत्व करण्यास अनेक नेते सक्षम आहे.तरीही मनभेद निर्माण करणारी वक्तव्ये करून आमच्या पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी संजय राऊत यांची इच्छा आहे का? असे छगन भुजबळ पत्रकारांशी बोलत होते.केंद्रीय यंत्रणांचा दबाव असल्यामुळे राष्ट्रवादीचे काही नेते भाजपसोबत जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. तेव्हा अजित पवारांनी तुम्ही आमचे प्रवक्ते आहात का?असे त्यांना खडसावले तर राहुल गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राऊतांचा नाना पटोले यांनी चोंबडेपणा बंद करा’ अशा शब्दांत समाचार घेतला होता.
सामनाच्या अग्रलेखात लिहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची पवारांनी घोषणा करताच खळबळ माजणे साहजिक होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या लेखात पुढे म्हटलं आहे पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादी असा स्वतंत्र पक्ष उभा केला, चालवला व टिकवला आहे
२०१४ पासून संजय राऊतांनी सेना-भाजप महायुतीला कायमच दृष्ट नजरेने बघायला सुरुवात केली त्यातच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायम सामनाच्या माध्यमातून टीका केली तसेच राऊतांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य करून सेना-भाजप युतीमध्ये दरी निर्माण केली वारंवार राऊत सांगत होते २०१९ ला शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल मग भाजपला सत्तेपासून दूर ठेण्यासाठीच २०१९ च्या अगोदरपासून ठाकरे-पवारांनी महाविकास आघाडी अस्तित्वात आणली होती का? शरद पवार हे सत्तेशिवाय जगूच शकत नाही असे बरेच राजकीय जाणकार सांगतात ते सत्तेसाठी कोणत्याही निष्क्रिय नेत्यांना तसेच प्रशासनाचा काडीचाही अनुभव नसणाऱ्याना घोड्यावर बसू शकतात अगदी तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी पुढे करून शिवसेनेची पद्धतशीरपणे शरद पवारांनी वाट लावली. पवार इतिहासात ज्या नेत्यांजवळ गेले त्यांनीच त्या जवळच्या व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलं आहे उदाहरणार्थ स्वर्गीय वसंत दादा पाटील यांना सत्तेतून खाली खेचून स्वतः मुख्यमंत्रीपदावर बसले अशी पवारांची ख्याती आहे महाराष्ट्राच्या मातीत गद्दारीची बीज शरद पवारांनी पेरली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीत कधी बिघाडी होईल सांगता येत नाही.पवार हे संजय राऊतांना हाताशी महाविकास आघाडीतील नेत्यांची शिकार करतात का? हे बघणं महत्वाचं असेल हे पुढील काळच ठरवेल.
