भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांवर एवढं बोलल्यावर त्यांनी उत्तर द्यायला हवं होतं. संजय राऊत यांनी हडतूड करून का होईना पण माझ्यावर बोलायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही, असं नितेश राणे म्हणालेत. तसंच संजय राऊत लॅन्डमाफिया आहेत, असंही नितेश राणे म्हणालेत. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी घणाघात केलाय.
“कैदी नंबर ८९५९ ची ही इच्छा आहे की मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे कपडे फाडावे असं दिसतं आहे. कारण तो आरोप करत असेल तर मी उत्तर देत राहणार आहे. संजय राजाराम राऊत हा किती मोठा लँड माफिया आहे हे मी महाराष्ट्राला सांगतो आहे. अलिबागच्या किहीम बीचवर संजय राऊतला जागा हवी होती. त्यामुळे मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावात दमदाटी करून जागा घेतली. पुशिरकर नावाचं ते कुटुंब आहे. किहीम बीचवर रिसॉर्ट बांधण्याचे याचे मनसुबे आहेत. कोट्यवधींची जमीन अवघ्या १० कोटींमध्ये घेतली. दुसऱ्यांना माफिया बोलणारा संजय राऊत किती मोठा लँड माफिया आहे याचं उत्तर महाराष्ट्राला तू दिलं पाहिजेस. मुंबईतल्या भांडुप, विक्रोळी या भागांमध्ये आर वरून सुरु होणाऱ्या बिल्डरसोबत तुझी पार्टनरशिप आहे त्या निमित्ताने तू किती लोकांच्या जमिनी बळकवल्या आहेत?” असाही प्रश्न नितेश राणेंनी विचारला आहे.
महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी संजय राऊत सामनाचा अग्रलेख लिहितात, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे. मागच्या 9 पासून महिन्यांपासून संजय राऊत राज्यात अशांतता पसरवण्याचं काम करत आहेत, असंही नितेश राणे म्हणालेत.दरम्यान पत्राचाळ प्रकरणावरूनही नितेश राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.
मराठी माणसांची पत्राचाळमध्ये यांनी घरे लाटली त्याप्रकरणात त्यांची आज कोर्टात हजेरी आहे. कैदी नंबर 89 59 ची आज कोर्टात हजेरी आहे, अशी टीका यावेळी नितेश राणे यांनी केली आहे.
