सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसली आहे. हे जनतेचे सरकार आहे यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे, अशाप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे, या देशात संविधान आहे त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामधून स्पष्ट झालं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही स्थापन केलेलं सरकार हे कायद्याला धरुन आहे हे स्पष्ट झालं सर्वोच्च न्यायालाने आज अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो. अपात्रतेबाबतचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असावा अशी आमची भूमिका होती. अपेक्षित असाच निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला होता त्याबाबतही माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमने टीका केली होती. त्यावरही निवडणूक आयोगाला अधिकार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. आयोगाने धनुष्यबाण आम्हाला दिला हे सर्वश्रृत आहे. दोन तीन महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला तो बहुमताचा होता, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
माजी मुख्यमंत्र्यांना माहिती होतं की बहुमत नाहीये. सरकार अल्पमतात आहे राज्यपालांना काय तुम्हालाही माहिती होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये निर्णय घेतला. आम्ही घटनात्मक बाबींची काळजी घेऊन सरकार स्थापन केले. त्याच्यांकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी सरकारने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले होते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला. लोकांना हवे असलेले आम्ही केले. नैतिकता कोणी जपली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही.असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
