वारकऱ्यांकरिता पंढरपूरसाठी नागपूर, अमरावतीवरुन विशेष ट्रेन – खासदार डॉ.अनिल बोंडे

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून महाराष्ट्राच आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक लाखोंच्या संख्येने पंढरपुरात दाखल होतात. प्रवासामुळे त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी पंढरपूरसाठी विशेष रेल्वे चालवण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून नागपूर व अमरावती येथून पंढरपूरकरिता विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी लाखो विठ्ठलभक्त व वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात.

त्यांच्या सोयीसुविधेसाठी अनेक ठिकाणी मदतीसाठी कॅम्प उभारले जातात. शिवाय विदर्भातून त्यांच्याकरिता प्रवासासाठी पुरेशी साधन उपलब्ध व्हावी यासाठी खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना 12 जून रोजी एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. त्यांच्या प्रवासाच्या सुविधेकरिता 25 व 26 जून रोजी पंढरपूर विशेष ट्रेन चालवावी अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. त्यानुसार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या पत्राची दखल घेतली आहे. विठ्ठलभक्तांकरिता नागपूर व नया अमरावती स्थानकावरून पंढरपूर विशेष ट्रेन सुरू करण्यात आली आहे. नागपूर व नया अमरावती येथून पंढरपूर विशेष ट्रेन चालवली जाणार असल्याने लाखो वारकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांनी खासदार डॉ.अनिल बोंडे यांचे मनस्वी आभार मानले आहेत. तर रेल्वे मंत्रालयाने ही ट्रेन सुरू केल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डॉ.अनिल बोंडे यांनी आभार मानले आहेत.