सत्तांतरानंतर कधीही संधी दिली नाही, कायम डावललं गेलं – मनीषा कायंदे

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला, सोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही कौतुक केलं. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संघटनात्मक काम द्यावं अशी मागणी केली.

यावेळी बोलतांना कायंदे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत आणि ओरिजनल शिवसेना आहे. इमाने-इतबारे मी मागच्या शिवसेनेत काम केलं. पक्षाची भूमिका मी भक्कमपणे मांडली. परंतु मागच्या वर्षभरात काहीही ऐकूण घेतलं जात नव्हतं.देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांचं आणि देवी बसली, असं म्हणून देवीचा अवमान करणाऱ्यांचं आता टीव्हीवर ऐकावं लागत आहे. ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, खरी शिवसेना इथे आहे असं कायंदे म्हणाल्या. यावेळी बोलताना त्यांनी सुषमा अंधारेंवर थेट टीका केली.

अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात आहेत. परंतु मला या सत्तांतराच्या काळानंतर कधीही संधी देण्यात आली नाही. अनेक ठिकाणी माझे प्रश्न आहेत ते डावलले जायचे. अनेक काम मला करायचं होतं. त्यासाठी मी संधी मागत होते. परंतू ती संधी मला उद्धव ठाकरे यांनी दिली नाही, असं मनिषा कायंदे म्हणाल्या. शिवसेना पक्षात अनेक पक्षप्रवेश होत आहेत. ते पाहून तसंच राज्याचा देखील विकास होत आहे, तो मी पाहत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा विकास होत असताना मला देखील विकासामध्ये यायचं होतं. म्हणून त्यासाठी मी आज निर्णय घेतला आणि या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला आहे, असं मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.

महाविकास आघाडी झाली हा निर्णय जुन्या शिवसैनिकांना आवडलं नव्हता. सरकारचं काम व्यवस्थित झालं नाही. पक्षप्रमुखांशी बोलताना अडचण येत असेल, पक्षप्रमुखांशी बोलू शकत नाही, मनोगत व्यक्त करु शकत नाही. कुणी कार्यकर्त्यांकडून पैसे उकळतं, महिला शिवसैनिकांकडून पैसे उकळत असेल तर योग्य नव्हतं, असं कायंदे म्हणाल्या.