भाजपा सोडून कुठेही जाणार नाही; पंकजा मुंडे यांनी केले स्पष्ट

वेगवेगळ्या पक्षांकडून मला पक्षात घ्यायला आवडेल, अशा प्रतिक्रिया आल्या. पण मी भाजपा सोडून कुठे जाणार नाही. माझ्या 20 वर्षांच्या राजकीय करियरमध्ये एकदाही सुट्टी घेतली नाही.आता सुट्टी घेऊन अंतर्मुख होऊन स्वतः ला पाहायचे आहे. मार्ग तपासायचा आहे. सध्याच्या राजकारणाचा मला कंटाळा आलाय, असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या,मी आज पत्रकार परिषद बोलवली आहे. कारण मला शेकडो कॉल येत आहेत. परवा एक बातमी आली की मी काँग्रेसच्या वाटेवर आहे. राहुल गांधी यांची भेट घेतली. मी राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना प्रत्यक्षात कधीही पाहिलेले नाही. एखाद्याचे करियर संपवण्याचा हा डाव आहे. माध्यमांवर जबाबदारी आहे. ज्याने कथन केले त्यांच्या विरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. ज्या चॅनलने काँग्रेस नेत्यांची भेट घेतली ही बातमी दिली. त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार. त्यांच्याकडे पुरावे मागणार आहे. माझं करिअर हे कवडीमोलाचं नाही असं
मुंडे म्हणाल्या, २०१९मध्ये माझा पराभव झाला.

त्यानंतर अनेक निर्णय झाले. मला तिकिट मिळाले नाही म्हणून मी नाराज असेल म्हणून पक्षाबाहेर जाणार अशा चर्चा झाल्या. मी जाहीर कार्यक्रमात भूमिका मांडली आहे. सातत्याने मी स्पष्टीकरण दिले तर माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. मला पक्षाने अनेकदा डावललं तरी मी नाराजी व्यक्त केली नाही. पक्षाचा आदेश मी कायमच अंतिम मानला.माझ करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा? तुम्ही प्रश्न चिन्ह लावुन बातम्या देता.चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत. पंकजा मुंडे पात्र की अपात्र हे पक्ष ठरवेल मी कसं सांगू. मी ईश्वर साक्ष सांगते मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी पक्ष प्रवेशासाठी भेटलेले नाही.

गेली 20 वर्षे मी राजकारणात आहे त्यामुळे मी लोकांसोबत थेट संवाद साधते.माझ्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत.पाठीत खंजीर खुपसण्याचे माझ्यावर संस्कार नाही. दरवेळी पंकजा मुंडे यांचे नाव येते व मला तिथे स्थान मिळत नाही. मला दोनवेळा फॉर्म भरायला सांगितला. पण नंतर तो भरू नका असे सांगण्यात आले. पण मी ‘जो आपकी आज्ञा’ म्हणत पक्षाचे आदेश ऐकले.याबाबत माझ्या पक्षाला विचारावे लागेल. जेव्हा जेव्हा माझे नाव गेले, मी कधीही टिप्पणी केली नाही. भागवत कराड यांना संधी दिली. त्यानंतर मीच त्यांच्या यात्रेला भगवा झेंडा दाखवला. राजकारणात येण्याचे माझे मूळ काय? पंडीत दीनदयाळ यांचे विचार माझ्याकडे आहे.

पक्ष हा माझ्यासाठी सर्वात प्रथम आहे. सर्वात प्रथम सत्ता आणि नंतर संघटन असे माझ्या रक्तात नाही. अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. मी फक्त मुद्द्यावर बोलतेय. मी नाराज नाही पण दुःखी आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंडे म्हणाल्या, बाळासाहेबांची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी राहिली नाही असे लोक बोलतात. पण दीनदयाळ उपाध्याय यांची भाजप सदैव राहो यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे.लपून छपून काम करणे मला जमत नाही.मला जे काही करायचे असेल ते मी डंकेकी चोट पर करेल. हा पक्ष संपला, ही सत्ता उलथवून टाकली यातच सगळे सुरु आहे. लोकांचे काय?