मत्स्य उत्पादक दिनानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद अमरावती : लघु उद्योगाला चालना मिळावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदैव प्रयत्नशील आहेत. मत्स्य उत्पादन मासेमार समाज संपन्न करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मत्स्य संपदा योजना असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले. मत्स्य उत्पादक दिनानिमित्त प्रादेशिक उपसंचालक मत्स्य विकास कार्यालय येथे शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना डॉ.बोंडे हे बोलत होते.
दरम्यान मार्गदर्शन करताना खासदार डॉ.अनिल बोंडे म्हणाले की, मासेमारी करणारा समाज हा विपन्नावस्थेत गेला होता. मात्र केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर व राज्यात 2014 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यावर त्यातून या समाजाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहे. हरित क्रांतीनंतर भारतात निल क्रांतीचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आहे. आयात निर्यातीतून उद्योग वाढीस लागावे. यासाठी प्रयत्न केला जात आहे. पूर्वी मासेमारीचे मोठ्या धरणांचे व तलावांचे कंत्राट हे मोठ्या व्यापाऱ्यांना दिले जात होते. मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर छोट्या व्यापाऱ्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालक नीलेश्वरी वऱ्हेकर यांनी केले. शेतकरी, व्यापारी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या समस्यांचे थेट निराकरण
कार्यक्रमाला उपस्थित शेतकरी रामदास बावणे, पवन कावणपुरे, गणेश बावणे, प्रकाश खंडारे आदी शेतकऱ्यांनी मत्स उत्पादन घेताना येणाऱ्या विविध समस्या यावेळी खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या पुढ्यात उपस्थित केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मत्स्य उत्पादन घेताना विजेच्या कनेक्शनचे समस्या होती. ती महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत डॉ.बोंडे यांनी तत्काळ निकाली काढली. तर महापालिकेशी असलेले संबंधित विषय आयुक्त देविदास पवार यांच्याशी त्यांनी फोनवरून संवाद साधत शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना केल्या.
सोशल प्लॅटफॉर्मचे केले उद्घाटन
प्रादेशिक उपसंचालक मत्स्य विकास विभागाच्या फेसबुक पेजचे दरम्यान उद्घाटन सुद्धा खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. डी.एम. वाघमोडे, निलेश्वरी वऱ्हेकर, अमिता जैन, बी. डी.पवार, बी. यन.सानप, वायचाळकर, के.वी. वाघमारे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
