अमरावती : येथील भाजीबाजार तारखेड परिसरात राहणारा विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता मनोज सोनी यांची हत्या करण्यात आल्याची घटना १ जुलै रोजी उघडकीस आली होती. या घटनेचा तपास सीबीआय, सीआयडीमार्फत करण्याची महत्त्वपूर्ण मागणी राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी, 14 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिला आहे. या पत्रानुसार विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता मनोज सोनी यांची दोन मुस्लिम युवकांनी निर्घुन हत्या केली. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचे अमरावती शहर पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. परंतु मनोज सोनी यांच्याकडे सापडलेल्या मोबाईलमध्ये एक मुस्लिम युवक हिंदू मुलीला घेऊन जाताना दिसतोय. यावरून एक महिन्यापासून मृतक मनोज सोनी हा लव्ह जिहाद प्रकरणांमध्ये अडसर ठरत होता. त्यामुळे त्याला संपविण्यासाठी समाजकंटकांनी हत्या केल्याचे दिसते. किरकोळ कारणातून झालेली हत्या यावरच न थांबता घटनेची संपूर्ण पाळेमुळे शोधून काढणे आवश्यक आहे.
अमरावती पोलीस आयुक्त यांच्याकडे घटनेसंदर्भातील पाठपुरावा करत असताना सोनी यांच्या मोबाईलमधील व्हिडिओमध्ये हिंदू मुलीची ओळख पटल्याचे सांगितले जाते. मात्र मुस्लिम युवकाची ओळख पटलेली नाही. अमरावती शहर परिसरामध्ये हिंदू-मुस्लिम अशी मिश्र वस्ती आहे. त्यामध्ये हा तरुण सापडणे सहज शक्य आहे. त्या मुस्लिम मुलाचे फोटो जर पोलिसांकडून प्रसारित करण्यात आले तर नक्कीच त्याचा सुगावा लागू शकते किंवा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणे आवश्यक आहे. अमरावती शहर पोलीस या घटनेचा तपास करण्यात यशस्वी होत नसतील तर सीआयडी, सीबीआय, एनआयएच्या माध्यमातून प्रकरणाचा तपास करुण सोनी यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केली आहे.

