रायगडच्या इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला आहे. त्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बाेलताना सविस्तर माहिती दिली. इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि तातडीने मदत पुरविण्याचे आदेश दिले.
दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार आहे. आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहे. शिवाय 5 लिटर रॉकेल, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील मोफत देण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे सांगतानाच छगन भुजबळ यांनी सांगितले.
इर्शाळवाडी येथे बचावकाय वेगाने सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जे लोक ढिगाऱ्याखालून काढले जात आहेत, त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत. आतापर्यंत 97 लोकांची ओळख पटली आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांना रुग्णालयात दाखल केलं आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येणार आहे. पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण घेता येत नाहीये, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
बचावकार्यासाठी ५०० ते ७०० माणसं घटनास्थळी – उपमुख्यमंत्री अजित पवार
रायगडमधील प्रशासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टरचा वापर सध्या तरी बचाव कार्यासाठी करता येणार नाही. मात्र बचावकार्यासाठी लागणारं सामान घेऊन जवळपास ५०० ते ७०० माणसं घटनास्थळी पोहोचली असून अजून माणसं पाठवण्यात येणार आहेत.
