मी घरी बसून किंवा सोशल मीडियावर सरकार चालवत नाही; मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले आहे. इतिहासात प्रथमच पालकमंत्र्यांचे कार्यालय महापालिका मुख्यालयात सुरु केल्यामुळे यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आदित्य ठाकरे यांनीही लोढा यांना कार्यालय देण्यास विरोध केला आहे. हुकूमशाही पद्धतीने घुसखोरी केल्याचा असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

यावर मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिलं आहे. मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “हे दालन मला दिलेले नसून पालकमंत्रीपदाला दिले आहे. मुंबई उपनगरचा पालकमंत्री या नात्याने विविध बैठकीसाठी अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलवावे लागते. हे सर्व सुकर व्हावे या हेतूने मुंबई महापालिका कार्यालयात पालकमंत्र्यांचे दालन सुरू करण्यात आले. लोढा यांनी यावेळी मी घरी बसून किंवा सोशल मीडियावर सरकार चालवत नाही असा अप्रत्यक्ष टोलाही उध्दव ठाकरेंना लगावला.

महायुती सरकार जनतेमध्ये जाऊन काम करणारे सरकार असून, मुंबईतील पालकमंत्री कार्यालय हे जनतेसाठी कार्यरत राहणार आहे. आम्ही महापालिकेच्या कार्यालयात बसून, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असेही ते म्हणाले.सरकार आपल्या दारी या संकल्पनेद्वारे पालकमंत्री हे महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये जाऊन जनता दरबार घेत आहेत. या कामांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने तसेच समस्या मांडणाऱ्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यालयात हे कार्यालय सुरू करून एक प्रकारे जनतेला न्याय देण्याचाही प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे, असे म्हटले आहे.

माजी मंत्री व ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेयांचे सरकार होते. त्यावेळी मुंबईकरांनी अनेक समस्यांचा सामना केला आहे. त्यामुळे आत्ता नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाला ते का विरोध करत आहेत असा सवालही मंत्री लोढा यांनी उपस्थित केला.