पालघर, पुणे, रायगडला रेड अलर्ट; पुढचे ४८ तास कोकणासाठी धोक्याचे

मुंबई आणि ठाण्यात काल (21 जुलै) रात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. आजही (22 जुलै) या भागासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज हे बंद राहणार आहेत. जुलै महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक 1000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

रायगड आणि कोकण विभागात जोरदार बरसणाऱ्या पावसानं अद्यापही विश्रांती घेतलेली नाही. काही दिवसांपूर्वी ये रे ये रे पावसा असं म्हणणारे अनेकजण आता मात्र जा रे जा रे पावसा असा सूर आळवताना दिसत आहेत. पण, हा पाऊस मात्र इतक्यात राज्यातून काढता पाय घेताना दिसत नाहीये.हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांसाठी रायगड, पालघर, पुणे, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांसाठी राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. पुढचे ४८ तास कोकणासाठी धोक्याचा असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.पालघर, ठाणे, रायगड, सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. अतीवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.मुंबईत देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत अजूनही संततधार सुरू आहे. काल शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम राहण्याची शक्यता आहे. ” रेड अलर्ट” असलेल्या जिल्ह्यांतील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याने यवतमाळ जिल्ह्यात अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.