विदर्भातील पाण्याचा गुण वेगळाच, आमचे उपमुख्यमंत्रीही विदर्भातले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या विधिमंडळ आमदारांनी विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते करावे अशी शिफारस अध्यक्षांना केली होती. आज विजय वडेट्टीवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागतपर भाषण करताना चांगलीच फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री म्हणाले, आमचे उपमुख्यमंत्री विदर्भाचे, विदर्भातील पाण्याचा गुण वेगळाच आहे. विदर्भातील सुनेला देशातील राष्ट्रपतीपद मिळालं. पाहुणचार करण्यात विदर्भ हात कोणी धरू शकत नाही. पावसाळा, हिवाळा सगळे ऋतू विदर्भात कडक असतात. तिथलं जेवण पण कडक असतं. तसे ते मूळ शिवसैनिक आहेत. त्यांचा स्वभाव बिनधास्त आहे.बेधडकपणा विदर्भातल्या लोकांमध्ये आढळतो. आज विजयभाऊंवर तसा अन्यायच झाला आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नाना पटोले, बाळासाहेब यांनी विरोधी पक्षनेतेपदावर बसवायला हवं होतं. आम्हाला वाटलं अधिवेशन असंच विरोधी पक्षनेत्याशिवाय जातंय की काय, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे. आता आम्ही त्यांना हात मिळवत होतो तर तुमच्या सगळ्यांचे चेहरे घाबरले होते. तुम्ही विजय भाऊंना पकडूनच बसले होते, असे एकनाथ शिंदेंनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

“विरोधी पक्षनेते म्हणून पदाला विजय वडेट्टीवार न्याय देतील अशी अपेक्षा आहे. विजय वडेट्टीवार मूळचे शिवसैनिक. त्यांचा स्वभावही आक्रमक, बेधडक, झोकून देऊन काम करणारा आहे. विदर्भाच्या पट्ट्यात शिवसेना वाढवण्याचं काम विजय वडेट्टीवार यांनी केलं. नेहमीच बाळासाहेबांचा ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हे तत्व विजयभाऊंनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही पाळलं”, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.