पुण्यात हवेतून चालणारी बस आणण्याचा प्रयत्न; देशातून पेट्रोल डिझेलला हद्दपार करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते चांदणी चौकातील पुलाचे लोकार्पण करण्यात आलं. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते. चांदणी चौकातील पुलासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.नितीन गडकरी म्हणाले, “पुण्यासाठी ४० हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पुण्यात आता डबल इंजिन लागलं आहे. एक दादा होते, आता दोन दादा झाले आहेत. त्यामुळे दोघांनी मनात आणलं, तर त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा विकास होणारच आहे. पुण्याला पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्त करणार आहे.”

अलिकडच्या काळात पुण्यातील वाहतूक कोंडीत मोठी वाढ झाली आहे. अशात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय सुचवला आहे. माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. माझी अजित दादा पवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांना एकदा विनंती आहे की, त्यांनी एकदा याचं एकदा प्रेझेंटेशन पहावं. पुण्यातील वाहतुक कोंडीवर हा चांगला पर्याय होईल, असं नितीन गडकरी म्हणालेत. शिवाय पुणे शहराच्या विकासाचा आराखडाही त्यांनी सांगितला. पुढची विकासाची दिशाही त्यांनी स्पष्ट केली.

नितीन गडकरी म्हणाले, अनेक अडचणींवर मात करून चांदणी चौकातील रस्त्याचं काम पूर्ण झाले आहे. पुण्यातील रस्त्यांसाठी मेधा कुलकर्णी यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. अडचणींवर मात करून चांदणी चौकातील रस्त्याचं काम पूर्ण झाले. चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मलेशिया, सिंगापूर इथल्या तंत्रज्ञानाचा वापर करून उड्डाण पूल करण्यात आला आहे. पुण्यात 40 हजार कोटींची कामे भविष्यात पूर्ण करणार आहे.

पुणे प्रदूषित करु नका. मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला रहायला यायचो तेव्हा पर्वतीवरुन गार हवा यायची. मला भारतातुन पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचेय. इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करु नका तर कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. तेच भविष्य आहे. पुण्याला पेट्रोल- डिझेल पासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदुषण कमी होईल. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी वापरला तर पुण्यात कचरा उरणार नाही.असेही यावेळी नितीन गडकरी म्हणाले.