उल्हासनगर मध्ये आमदार गणपतराव गायकवाड यांनी वैयक्तिक वादातून गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. यावरून विरोधी पक्ष महाराष्ट्राचा बिहार झाल्याचा आरोप करत आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेव्हा खरोखरच महाराष्ट्राचा बिहार झाला होता त्याची आठवण लोकांना येऊ लागली आहे.
उद्योगपतींना खंडण्या मागायच्या, पोलिसांनीच त्यामध्ये सहभागी व्हायचे बिहार मधील रीत. अनिल देशमुख गृहमंत्री असताना खरोखरच असा प्रकार घडला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या सचिन वाजे याने देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कार मायकेल रोडवरील अंटेलिया बंगल्यापासून ३०० मीटर अंतरावर हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या २० कांड्या व धमकीचे पत्र ठेवले होते. यातील धक्कादायक बाब म्हणजे तो राजाच हातात आमदारखाण्याच्या किल्ल्या देण्यात आल्या होत्या. अनिल देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाजेकडेच या प्रकरणाचा तपास दिला होता.
बरे हा सचिन वाजे कोण होता? पोलीस दलात काम करतांना मुंबईमध्ये श् ख्वाजा युनूस नावाच्या युवकाचा खून करून खुनाचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सचिन वाझेविरुद्ध भादवि ३०२, २०१ अंतर्गत गुन्हा नोंद होवून सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाचे सचिन वाझेला पोलीस सेवेतून निलंबित करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर सचिन वाजे हा १६ वर्षापर्यंत निलंबित होता. त्याने नंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी २०१८ मध्ये स्वतःचे गैरहेतू व गुन्हे करवून घेण्यासाठी सचिन वाजेला नियमबाह्य पद्धतीने पुन्हा पोलीस दलात सामावून घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देंवेंद्र फडवणीस यांच्यावर सन २०१८ मध्ये दबाव टाकला. परंतु देवेंद्र फडवणीस यांनी गैरकायदेशीर मागणी मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर सन २०१९-२० मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पदाचा दुरुपयोग करून तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करून नियमबाह्य पद्धतीने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून सचिन वाजेला पुन्हा पोलीस दलात सामावून घेतले. त्याला विशेष कार्यभार दिला.
हे जे घडले होते ते तर बिहारपेक्षाही भयानक होते. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांना अशाच पद्धतीने गुन्हेगारी कारवाई करण्यासाठी वापरून घेतले जात होते. सचिन वाजेने खरोखरच त्याच्यावर उपकार करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांची ते सांगतील त्या पद्धतीने चाकरी सुरू केली. गृहमंत्री झालेल्या अनिल देशमुख यांना मुंबईतील नाईट लाईफ पैसे कमावण्याचे साधन वाटू लागले. अनिल देशमुख यांनी वाजेला बार आणि हुक्का पार्लरमधून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते. वाजे हे काम बिनबोभाट पारही पाडू लागला होता. पण मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना त्याचा संशय आला. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र महाविकास आघाडी सरकार किंवा उद्धव ठाकरे यांनी त्यावर चौकशी करण्यास नकार दिला. शेवटी उच्च न्यायालयाने हिरवा सिग्नल दिल्यावर सीबीआयकडून चौकशी सुरू झाली. परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांना रिट याचिका कराव्या लागल्या होत्या.याचिकाकर्त्या डॉ.जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते कि, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.
या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे कि, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलिस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. अशा वेळी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येते आहे. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्याला अटक होण्याची घटनाही महाराष्ट्राने पाहिली. बिहार किंवा उत्तर प्रदेशातही असे आजपर्यंत घडलेले नाही. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर ठेवलेल्या मोटारीतील स्फोटके ठेवल्याचा प्रकार. अतिरेकी संघटनेकडून ही ठेवण्यात आल्याचा बनाव सचिन वाजेने रचला होता.
याबाबत कटही आखण्यात आला होता. मात्र, यामध्ये सहभागी होण्यास वाजे याचा मित्र आणि वाहतूक व्यावसायिक मनसुख हिरेन याने नकार दिला. या प्रकरणात अटक करून घेण्यासाठी वाजे त्याच्यावर दबाव आणत होता. त्यामुळे सुपारी देऊन मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. या हत्येच्या प्रकरणात तपासात वाजे याचे नाव समोर आले. त्यातूनच हा कट उघडकीस येऊन बनावट दहशतवादी संघटनेचा बनाव उघड झाला होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डी गँगशी संबंधित सुभाष सिंग ठाकूरने सचिन वाजेच्या सांगण्यावरून एका मध्यस्थीच्या माध्यमातून यूएई येथील सर्व्हरवरून सोशल मीडियावर मेसेज पाठवला.त्यासाठी मोबाइल फोन तिहार जेलमधील इंडियन मुजाहिद्दीनचा हस्तक तेहसीन अख्तर याच्याकडे पोहोचविण्यात आला. त्यावर यूएईचा सर्व्हर सेट करण्यात आला. हा मेसेज पाठविण्याकरिता टेलिग्राम या सोशल मीडियावर जैश-उल-हिंद नावाने एक ग्रुप बनवला गेला होता.
उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांचा निकटवर्तीय सचिन वाजे त्यांच्यासाठी पैसे कमावण्याचे साधन बनला होता. तोवापरत असलेल्या महागड्या गाडीत चक्क नोटा मोजण्याचे मशीन सापडले होते. कदाचित आपल्या राजकीय पालकांना हिशोब देताना चूक होऊ नये यासाठी तो नोटा मोजण्याचे मशीन वापरत असावा. त्यामुळेचसचिन वाझेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे विरोध करत होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून ( NIA) तपासाला विरोध केला. एनआयएने संपूर्ण पुरावे तपासून सचिन वाझेनेच खुन केल्याचे सिद्ध झाल्याने सचिन वाझेला अटक केली.त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाजे हा लादेन आहे का ? असे आरोप करत सचिन वाजेला वाचविण्याचा प्रयत्न केला.
महाविकास आघाडीच्या आणि विशेषतः अनिल देशमुख गृहमंत्री असताना राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थितीतच बिघडली नव्हती तर पोलीस दल राजकीय हत्यार बनले होते. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस दलाची साफसफाई केली. महाराष्ट्राला बिहार होण्यापासून वाचविले.
