कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका; भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश

भारताची परराष्ट्र नीती यशस्वी ठरली असून कतारने ज्या आठ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची सुटका केली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता. कतारने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्यांना आवाहन केलं, तसंच त्यांच्याविषयीची जी कागदपत्रं होती त्यांची पूर्तताही केली. त्यानंतर या सगळ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात आली. मात्र आता ही बातमी येते आहे की या आठही माजी नौसैनिकांची सुटका करण्यात आली आहे. यापैकी सात जण मायदेशी परतले आहेत.

भारताच्या विनंतीवरून, कतारच्या अमीरनं आठ नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा आधीच कमी केली होती आणि त्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर केलं होतं. आता परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, त्या आठही नौदल अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली असून यापैकी सात माजी नौदल अधिकारी भारतात परतले आहेत.परराष्ट्र मंत्रालयानं यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, कतारमध्ये अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचं भारत सरकार स्वागत करतं. या आठपैकी सातजण भारतात परतले आहेत. आम्ही या नागरिकांच्या सुटकेची आणि त्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याच्या कतार राज्याच्या अमीरच्या निर्णयाचं आम्ही कौतुक करतो.

माजी नौसैनिकांनीही कतार तुरुंगातून भारतात परतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्यस्थीशिवाय हे शक्य झाले नसते आणि आज आम्ही तुमच्यासमोर उभे राहिलो नसतो, असे मत एका माजी नौसैनिकाने व्यक्त केले. भारत सरकारने खूप प्रयत्न केले आणि आता आम्ही येथे आहोत. कतार तुरुंगातून परतलेला आणखी एक नौसैनिक म्हणाला, आम्ही भारतात परत येण्यासाठी जवळजवळ 18 महिने वाट पाहिली. आम्ही पंतप्रधानांचे अत्यंत आभारी आहोत. त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपाशिवाय आणि कतारशी त्यांचे संबंध याशिवाय हे शक्य झाले नसते. आम्ही भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल मनापासून आभारी आहोत. त्यांच्या प्रयत्नांशिवाय हा दिवस शक्य झाला नसता.