अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये येतील पण; बाळासाहेब थोरात यांचे भाकित आणि काँग्रेसच्या अधिवेशनात हशा

लोणावळ्यात सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराचा प्रभाव आहे. अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये येतील असे भाकित ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्यावर संपूर्ण सभागृहात हशा पिकला.

महाराष्ट्र काँग्रेसचे अधिवेशन लोणावळा येथे सुरू आहे. अधिवेशनात दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण यांच्याबाबत बोलताना थोरात म्हणाले, “मी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांना म्हणालो की, अशोक चव्हाण हे पुन्हा काँग्रेसमध्ये येतील. तेव्हा ते खूष झाले आणि म्हणाले खरंच अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये परत येतील. तेव्हा मी त्यांना थांबवलं आणि सांगितलं आत्ता नाही, पण काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अशोक चव्हाण नक्की पुन्हा काँग्रेसमध्ये येतील”, हे सांगताच संपूर्ण सभागृहामध्ये मोठा हशा पिकला.

लोकसभा निवडणुकांसाठी आपण महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत. आघाडी करण्याचे आमचे पूर्ण प्रयत्न आहेत. त्यामुळे सगळ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार असतील असे होणार नाही. त्यामुळे उमेदवार महाविकास आघाडीचा कुठलाही असला तरी केंद्रातील भाजप सरकारला आणि मोदींना पायउतार करण्यासाठी ताकदीनिशी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

सध्या काँग्रेस सोडून काही लोक उड्या मारत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी अस्वस्थतेची भावना आहे. मात्र काँग्रेसने यापेक्षाही वाईट दिवस पाहिले आहेत. त्यामुळे या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी खंबीर राहणे आवश्यक आहे. कारण काही राजकारणी हे व्यावसायिक झाले आहेत. सत्ता येईल तिकडे उड्या मारण्याचे प्रकार त्यांच्याकडून सुरू असतात. काँग्रेसची सत्ता गेली की ते इतर पक्षात जातात आणि मंत्रिपद उपभोगतात आणि परत सत्ता आल्यानंतर काँग्रेसमध्ये येतात, अशा घटना अनेकदा घडल्या आहेत, असेही थोरात यांनी सांगितले.

रक्तातच कॉग्रेस, पक्ष सोडणार नाही : प्रणिती शिंदे

काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, माझी तत्व आणि विचार हे काँग्रेसचे आहेत. त्यामुळे मरेपर्यंत मी काँग्रेस सोडणार नाही. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. पक्षातून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना परत आणण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे. उलट आम्ही भाजपला संपवू .

आम्हाला आमचे उमेदवार लोकसभेला निवडून आणायचे आहेत, आम्ही जनतेत फिरतो, त्यावेळी लोकांनाही बदल हवा आहे. लोकांना भाजप नकोय आता, ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत, त्या त्या ठिकाणी आम्ही १०० टक्के जिंकून येणार, भाजप हवा करतंय. यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसला संपवण्याची फक्त स्वप्न बघावी, तसेच त्यांचा ग्राऊण्ड लेव्हलवर अभ्यास कमी आहे. अशोक चव्हाण हे भाजप सोबत गेले, मात्र त्यांना प्रचंड प्रेशर करण्यात आलं, त्यांनी अंतर्गत कारणामुळे काँग्रेस सोडली. नांदेडमधील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमच्यासोबत असल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या.