महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.
काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी सक्रीय राजकारणापासून दूर होते.
मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी होते. विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पदं मनोहर जोशी भूषवली होती. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते.
महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे.
मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता. नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी नोहर जोशी जांना श्रद्धांजली वाहिली आहे.
