शरद पवारांच्या घरात काय शिजणार? मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रीमंडळाला घरी भोजनाचे निमंत्रण

शरद पवारांचे राजकारण भल्या भल्यांना समजत नाही. एका बाजुला त्यांचे गटाचे लोक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार असोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका करत आहेत. मात्र, दुसरीकडे शरद पवार या दोघांना भोजनाचे निमंत्रण देत आहेत.

बारामतीत शनिवारी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी हे दोघे येणार आहेत. शरद पवारांनी त्यानिमित्ताने दोघांना विद्या प्रतिष्ठानच्या बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी निमंत्रित केले आहे. ऐवढेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी पत्र लिहून म्हटले आहे की आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात. याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील ‘गोविंदबाग’ ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचा देखील आपण स्विकार करावा. आता शरद पवारांच्या घरी काय शिजणार याची उत्सुकता मात्र जनतेलाच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही लागली आहे.

शरद पवारांच्या पत्रातील नमुना नक्की काय ?

मुख्यमंत्री मोहदय आपण ०२ मार्च, २०२४ रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. सदर शासकीय कार्यक्रमांप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सौ. सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच उक्त दिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो.त्यासोबतच विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रीत करतो. आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील ‘गोविंदबाग’ ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचा देखील स्वीकार करावा. दोन्ही सस्नेह आमंत्रणांचा आपण स्विकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

विद्या प्रतिष्ठान हायजॅक करण्याचा प्रयत्न ?

बारामतीत होणारा नमो महारोजगार मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना शासनाकडून निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे अजित पवारांकडून विद्या प्रतिष्ठान हायजॅक करण्याचा प्रयत्न चालू असल्याच्या चर्चा बारामतीत रंगू लागलया आहेत. परंतु शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून हायजॅक थांबवण्याचा प्रयत्न चालू असल्याच्या चर्चा देखील त्याच बारामती रंगत आहेत.