शरद पवारांनी 1999 मध्ये नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. तत्कालीन काँग्रेस मधील अनेक नेते त्यांच्याकडे जात होते. पुणे जिल्ह्यात काँग्रेस रिकामीच होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. पण यावेळी काँग्रेसचा एक नेता होता जो शरद पवार यांच्यासमोर ठामपणे उभा होता. तो म्हणजे अनंतराव थोपटे.
1999 मधील निवडणुकीची लगबग सुरू झाली. टिळक स्मारक मंदिराच्या प्रांगणात झालेल्या वसंत व्याख्यानमालेत पक्ष सोडण्यामागची आपली भूमिका शरद पवारांनी सांगितली. याच ठिकाणी त्यांनी सोनिया गांधींचे परदेशी नागरिकत्व आणि इटलीतील सोनिया यांचे उदाहरण दिले.
काँग्रेसनेही अनंतराव थोपटे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांना चूक उत्तर देण्याचे ठरवले. टिळक स्मारक मंदिरात काँग्रेसने सभा घेतली. आनंदराव थोपटे यांनी जोरदार भाषण केले. शरद पवार कधी रक्तदान करत नाहीत. कारण त्यांचे रक्त घेतले जात नाही. या रक्तातच गद्दारी आहे अशी घणाघाती टीका थोपटेंनी केली. या निवडणुकीत थोपटे काँग्रेसचे स्टार प्रचारक बनले होते. संपूर्ण राज्य त्यांनी पिंजून काढले.
एकत्रित काँग्रेस असतानाही पवार- थोपटे संघर्ष होता. त्यामुळेच १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉग्रेसची स्थापना केल्यावर अनंतराव थोपटे त्यांच्या विरोधात सक्रीय झाले होते. काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा सोनिया गांधी यांची देशातली पहिली जाहीर सभा भोरच्या माळावर प्रचंड गर्दीत झाली होती. सोनियाजींनी देशातली आपली पहिली जाहीर सभा अनंतराव थोपटे यांना दिल्याची त्यावेळी जोरदार चर्चा देशभर रंगली होती.ही सभा भोरमध्ये घेऊन थोपटे यांनी ताकद दाखवून दिली या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता अनंतराव थोपटे निवडून येणार आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री बनणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. कारण अनंतराव हे त्यावेळी काँग्रेसचे सर्वांत ज्येष्ठ नेते होते. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे या दोन्ही काँग्रेस नेत्यांपेक्षा ते ज्येष्ठ नेते होते. अनंतराव थोपटे हे तब्बल तेरा वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात होते. अनेक खात्यांचा त्यांना अनुभव होता. वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले होते.
पण शरद पवारही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. अनंतराव थोपटे यांना घरच्याच मैदानात चितपट करण्याची रणनिती त्यांनी आखली. थोपटे यांच्याच काशिनाथ खुटवड या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. या निवडणुकीत प्रचंड ताकद थोपटे यांच्या विरोधात लावली. अनंतराव थोपटे यांचा धक्कादायक पराभव झाला.अनंतराव मुख्यमंत्री झाले असते, अशी चर्चा होती. मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर अनंतरावांची संधी हुकली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्यावर 2004 मध्ये अनंतराव थोपटे पुन्हा आमदार झाले. पण त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. १९९९ च्या पराभवानंतर थोपटे घराण्याची मंत्रीपदाची संधी हुकली ती हुकलीच. त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे सलग तीन वेळा आमदारपदी निवडून आल्यावरही त्यांना मंत्रीपद दिले नाही. यामागे शरद पवारांचा विरोध होता, अशी चर्चा होती.
आता बारामती लोकसभा मतदारसंघातील संघर्ष वाढला आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातील एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शरद पवार यांनी भेट घेतली.
बारामती लोकसभेसाठी दोन्ही पवार गटांकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. सुप्रिया सुळे येथून लढणार हे स्पष्ट आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारच मैदानात असणार आहे असे जाहीर केले आहे. त्यामुळे सुळे यांच्यासाठी ही लढत सोपी नसणार आहे. भोर मतदारसंघातील गणित बिघडू नये यासाठी शरद पवारांनी काँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे यांच्या भोरमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार असल्याने आता मात्र शरद पवारांकडून अनंतराव थोपटेंसोबत असलेल्या जुन्या संघर्षाच्या इतिहासाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न या भेटीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघातील पहिल्या सभेसाठी भोरची निवड केली गेली आहे. काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांनी अनंतराव थोपटेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती आणि तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र आज जाहीर सभा घेऊनच शरद पवारांनी थोपटेंना बांधून घेतले आहे.
