नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीतही प्रचार; स्टार प्रचारकांची फौज राजधानीच्या मैदानात उतरणार

लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे धामधूम व आरोप प्रत्यारोपात आटोपले. नेत्यांचे भाषण तसेच गर्दीच्या सभा यामुळे रंगत आली. भाजप नेत्यांनी तर कसलीच कसर नं ठेवता मैदान गाजविले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची सर्वाधिक मागणी भाजप उमेदवारांकडून झाल्याचे चित्र होते. त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री असलेले स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांची डिमांड राहली. स्वतंत्र सभा घेत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढल्याचे पाहायला मिळाले.

कारण केवळ भाजप उमेदवारांसाठीच नव्हे तर मित्रपक्ष राष्ट्रवादी व शिवसेना यांचेही उमेदवार त्यांना सभा घेण्याची विनंती करतात.स्वतःच्या सभा त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी असतेच.विविध टप्प्यात फडणवीस यांच्या सभांचे आयोजन झाले व होत आहे. महाराष्ट्रात ७ मे रोजी मतदानाचा तिसरा टप्पा झाला. त्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले या ठिकाणी मतदान झाले.

लोकसभा निवडणुकीत राजधानीतील सातही जागा जिंकण्याचीहैट्रिक करण्यास उत्सुक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिग्गजांची जी फौज उतरणार आहे, त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही नावे आहेत.

लोकसभा निवडणुकीत दिल्लीसाठी भाजपने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत ४० नेत्यांची नावे आहेत. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, काँग्रेसमधून अलीकडेच भाजपमध्ये आलेले अरविंदसिंग लवली, पीयूष गोयल, हरदीपसिंग पुरी, स्मृती इराणी, अर्जुन राम मेघवाल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आदींची नावे आहेत.

दिल्लीत लोकसभेच्या सात जागांसाठी सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे. चांदनी चौक, उत्तर पूर्व दिल्ली, दिल्ली पूर्व, नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, ईशान्य व वायव्य दिल्ली आणि पश्चिम दिल्ली या साऱ्या जागा २०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी भाजपने भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी वगळता सातपैकी सहा जागांवर नवे चेहरे उभे केले आहेत.