शहरासह राज्यात उन्हाचे चटके आता अधिक तीव्र होऊ लागले आहेत. एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त असतानाच येत्या काळात पाणीटंचाईचे भीषण संकट राज्यापुढे उभे ठाकले आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये बुधवारी केवळ २४.०३ टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. यात छत्रपती संभाजीनगर येथे परिस्थिती खूपच बिकट असून, याठिकाणी धरणांमधील पाणीसाठा अवघ्या ९.७३ टक्क्यांवर आला आहे. राज्यातील सुमारे १० हजार गावे आणि वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.
पुणे विभागात ५ लाख २५ हजार पशुधनांना सुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर पुणे जिल्ह्यात सुरू असून, २२९ टँकरने १७३ गावांमधील सुमारे चार लाख नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ११ तालुक्यांत टँकर सुरू आहेत. तर साताऱ्यामध्ये १९९ टँकर, सांगली १०७ टँकर, सोलापूरमध्ये १७९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत अवघे २७ टँकर सुरू होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी मोठ्या प्रमाणात टँकरची संख्या वाढली आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात २३ टँकर सुरू असून, २७ गावांमधील १३५ वाड्या-वस्त्यांमधील ४९ हजार नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बारामती तालुक्यात २८ टँकर सुरू आहेत. १७ गावांमधील ४३ हजार ८९६ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जलसंपदा विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २२ मेपर्यंतच्या पाणीसाठ्यामध्ये एकूण दोन हजार ९९४ धरणांतील पाण्याचा समावेश आहे. गेल्यावर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये ३४.३६ टक्के पाणीसाठा होता, तर यंदा तो थेट २४.०३ टक्क्यांवर आला आहे. यातील सर्वांत कमी पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर येथे नोंदवण्यात आला आहे. येथील एकूण ९२० धरणांमध्ये केवळ ९.७३ टक्के पाणी शिल्लक आहे. या धरणांमध्ये केवळ ७०६.१९ द.ल.घ.मी पाणीसाठा उपयुक्त आहे. त्यापाठोपाठ पुण्यातील एकूण ७२० धरणांमध्ये १८.१८ टक्के, नाशिक येथील ५३७ धरणांमध्ये २६.३४ टक्के, तर कोकणातील १७३ धरणांमध्ये ३७.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर येथे ३८३ धरणांमध्ये ३८.८८ टक्के आणि अमरावतीमधील २६१ धरणांमध्ये ४०.१७ टक्के साठा आहे.
मागील वर्षी पावसाचं प्रमाण खूप कमी राहीलं होतं. त्यामुळं धरण असेल तलाव असतील यामध्ये पाण्याचा साठा हा कमी प्रमाणात राहिला होता. तसेच उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं विहीरी आणि बोअरवेलची पाणी पातळी देखील खाली गेलीय. तर काही ठिकाणी विहीरी आटल्या आहेत तर बोअरवेल बंद पडले आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. पाणी नसल्यामुळं जनावरांसह त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. जनावरे कशी जगवावीत असा सवाल शेतकरी करताना दिसत आहेत.
