विधानपरिषद निवडणुकीतून अखेर मनसेने बिनशर्त माघार घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले होते. त्यानंतर मनसेने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माध्यमांना दिली. यावेळी सरदेसाईंसह अविनाश जाधव, अभिजीत पानसे, भाजप नेते प्रसाद लाड उपस्थित होते. त्यामुळे भाजपसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपकजून निरंजन डावखरे रिंगणात आहेत. डावखरे हे मागच्या दोन टर्मपासून कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार आहेत. डावखरे यांच्यासाठी मनसेने माघार घेतली आहे. या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होत. निरंजन डावखरे यांची मुदत आता संपत आहे. त्यामुळे या मतदार संघातून त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल. महायुतीचे तेच उमेदवार असतील अशी चर्चा होती. त्याच वेळी मनसेने अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधरसाठी मैदानात उतरवले. त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली होती. मनसेने उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपमध्ये त्याचे पडसाद उमटले होते. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. आता निरंजन डावखरे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. देवेंद्र फडणवीसांनी विनंती केली म्हणून आपण उमेदवारी माघार घेत असल्याचे यावेळी नितीन सरदेसाई यांनी माध्यमांना सांगितले.
कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी अचानक अभिजीत पानसेंचं नाव जाहीर करून भाजपची पुरती गोची केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. राज्यात बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अतिरीक्त मदतीमुळे, यंदाही निरंजन डावखरेंसाठी ही लढत सोपी मानली जात होती. पण ऐनवेळी राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे, महायुतीच्या गोटात मिठाचा खडा टाकल्याची चर्चा रंगली होती.
कोकण पदवीधर मतदारसंघातून लढण्याची सर्व तयारी मनसेने केली होती. पण फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा पक्षाला काय फायदा होईल, हे तुम्हाला नजीकच्या काळात कळेलच. विधानसभा निवडणुकीत इतरांना पाठिंबा देण्याची वेळ येणार नाही. अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, असे फडणवीसांनी सांगितल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितले.
