विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधीचे बळ देण्यात आले आहे. कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ हा आता महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाने परिचलनासाठी ताब्यात घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते एनडी आर्ट वर्ल्ड या संस्थेस १३० कोटींचा धनादेश देऊन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. (ND Studio gets funding from Chief Minister to fulfill Nitin Desais dream)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एन.डी. स्टुडिओसाठी ₹130 कोटींचा धनादेश महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यामार्फत सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री आशिष जयस्वाल व इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
स्टुडिओ केवळ चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणापुरता मर्यादित न राहता, वेब मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणारा केंद्र बनवण्याचे नियोजन आहे. रिकाम्या जागांचा कार्यक्षम वापर आणि नवीन सुविधा जोडून त्याची आकर्षकता वाढवली जाणार आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जानेवारी 2025 मध्ये एनडी स्टुडिओच्या आधुनिकीकरणासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याचे निर्देश दिले होते. या योजनेचा उद्देश स्टुडिओला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे, त्याचा व्यावसायिक वापर वाढवणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हा आहे.
नितीन चंद्रकांत देसाई यांनी २ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांनीच उभारलेल्या एन.डी. स्टुडिओत गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. आहे. एनडी स्टुडिओवर जप्तीची टांगती तलवार होती.
भारतात सर्वात मोठी सिने इंडस्ट्री आहे. तरीही चित्रीकरणासाठी परदेशात जावे लागत असल्याने नितीन देसाई याना स्टुडिओ निर्मितीचा ध्यास लागला होता. त्यातूनच त्यांनी कर्जत येथे ५२ एकर जागेत भव्य स्टुडिओची निर्मिती केली.
