विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात प्रदूषणमुक्त आणि स्वस्त प्रवासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा करत सांगितलं की, महाराष्ट्रात आता ई-बाईक आणि ई-टॅक्सी सेवा अधिकृतपणे सुरू होणार आहे. ( A big step towards pollutionfree travel Cabinet gives green light to ebike taxis)
ही सेवा एकट्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, भाड्याच्या खर्चात लक्षणीय कपात होणार आहे. सुरुवातीला ही सेवा १५ किलोमीटरच्या मर्यादेत मर्यादित असणार असून, केवळ ५० किंवा त्याहून अधिक बाईक असलेल्या कंपन्यांनाच परवाना दिला जाणार आहे.
महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने खास नियमावली तयार करण्यात आली आहे. पावसाळ्यात प्रवास अधिक सुरक्षित राहावा म्हणून कव्हर असलेल्या बाईक व ई-टॅक्सी उपलब्ध असतील. याशिवाय, सर्व वाहनांत जीपीएस आणि सुरक्षा अलार्मसारख्या सुविधा असतील.
सरकारच्या या निर्णयामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून, स्वस्त प्रवासाच्या पर्यायामुळे सामान्य प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. खास बाब म्हणजे, जर रिक्षाचालकांच्या मुलांनी ही ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू केली, तर त्यांना दहा हजार रुपयांचं सरकारी अनुदानही दिलं जाणार आहे.
या उपक्रमामुळे रोजगाराचं नवं दालन उघडणार असून, मुंबईत अंदाजे दहा हजार तर संपूर्ण महाराष्ट्रात वीस हजारांहून अधिक रोजगार संधी निर्माण होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
“ई-बाईक टॅक्सी ही महाराष्ट्रासाठी प्रवासाचा नवा, पर्यावरणपूरक पर्याय ठरणार आहे. हे पाऊल केवळ वाहतुकीत क्रांती घडवणार नाही, तर रोजगारनिर्मितीलाही गती देईल,” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
