बाळासाहेबांच्या विचारांचा वापर केवळ राजकीय स्टंटसाठी; एआयच्या बनावट आवाजाचा आधार म्हणजे उद्धव ठाकरेंचा खोटारडेपणा, शिंदे गटाचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

नाशिक : शिवसेना प्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचा बनावट AI आवाज वापरून नाशिकच्या मेळाव्यात भाषण सादर केल्याने राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 16 एप्रिल रोजी नाशिकमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात बाळासाहेबांच्या नावे गद्दारी आणि निष्ठा यावर भाष्य करणारे भाषण ऐकवण्यात आले. मात्र, या बनावट तंत्रज्ञानाधारित भाषणावरुन उद्धव ठाकरेंना प्रखर टीकेचा सामना करावा लागत आहे. ( Balasahebs thoughts used only for political stunts The basis of AIs fake voice is Uddhav Thackerays lies Shinde groups attacks)

शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी या संपूर्ण प्रकाराला “बाळासाहेबांचा अपमान” असे संबोधित करत, “ज्यांनी बाळासाहेबांच्या खऱ्या विचारांचा त्याग केला, तेच आज बनावट आवाज वापरून त्यांच्या नावे राजकारण करत आहेत,” असा घणाघात केला.

नरेश म्हस्के म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा पक्ष संपत चालला आहे. त्यांना आज बाळासाहेबांचा बनावट आवाज वापरण्याची वेळ आली आहे, हेच दाखवतं की त्यांच्या हातात काही उरलेलं नाही. जे विचार बाळासाहेबांनी मांडले, त्याच विचारांना त्यांनी पायदळी तुडवलं, आणि आता केवळ मेळाव्यांत भावनिक नाट्य करून लोकांना गंडावत आहेत.”

“बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करणं आणि त्यांच्या आवाजाची नकली क्लिप तयार करून ती लोकांसमोर मांडणं ही श्रद्धांजली नाही, तर राजकीय नौटंकी आहे,” असं म्हणत म्हस्के यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर थेट सवाल उपस्थित केला.

म्हस्के म्हणाले, “उद्धव ठाकरे हिंदुत्वाची बात करतात, पण सावरकरांचा अपमान कोणी केला? शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ उपयोग करून घेणं आणि प्रत्यक्ष कृतीत तसा आदर्श न दाखवणं, हे जनतेला समजतंय. आज सभागृहात बसून मेळावे घेणारे लोक बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा सांगतात, हीच मोठी शोकांतिका आहे.”

“हातात तलवार धरायला मनगटात ताकद लागते. फेसबुकवर पोस्ट करून मर्दानगी दाखवत नाही. दाढी वाढवून कोणीही शिवराय होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हृदयात हवा लागतो, तो विचार तुमच्यात नाही,” अशी थेट टीका करत म्हस्केंनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणातल्या ‘दाढी’ उल्लेखावर उत्तर दिलं.

राजकीय अस्तित्व गमावलेल्या उद्धव ठाकरेंना आता बाळासाहेबांचा बनावट आवाज वापरून सहानुभूती मिळवावी लागते आहे, हेच दर्शवते की शिवसेनेचा खरा विचार आणि मूळ वर्चस्व आज शिंदे गटाकडेच आहे, असा ठाम दावा शिंदे गटाकडून करण्यात येतो आहे.