विशेष प्रतिनिधी
मुंबई : वाहतूक समस्येने त्रस्त मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुड न्युज दिली आहे. पुढील वर्षीपर्यंत मेट्रोचा १५० किलोमीटरचा मार्ग पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. (Good news from the Chief Minister for Mumbaikars150 km of metro line to be completed by next year)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्ग ७ अ मधील १.६५ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचे ‘ ब्रेक थ्रू ‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. यावेळी कौशल,रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच कळ दाबून ‘ब्रेक थ्रू’ कामाला सुरुवात केली. यानंतर या कामाची पाहणी केली. हा भुयारी बोगदा मेट्रो ७ अ वर डाऊनलाईन वर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्टेशन ते एअरपोर्ट कॉलनी स्टेशन दरम्यान हा बोगदा असणार आहे. ही मेट्रो जोडणे मुंबई महानगर प्रदेशातील एकूण मेट्रो जाळ्यासाठी महत्त्वाचा टप्पा असणार आहे. या मेट्रो मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील मीरा-भाईंदर व पुढे वसई – विरार हा भाग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत मेट्रोने जोडले जातील. तसेच ठाणे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा मेट्रो ने जोडण्यात येईल. या मेट्रो मार्गाचे ५९ टक्के काम पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पाची पाहणी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अभियांत्रिकीत चमत्कार असलेल्या टनेलचे काम पूर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते विमानतळ मार्गाचे एकत्रिकरण करण्याचा हा नवीन प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला. खूप अवघड परिस्थितीत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे मुंबईकरांना खूप फायदा मिळणार आहे. आता १५० किलोमीटरचा मार्ग पुढील वर्षापर्यंत अस्तित्वात येईल.
राज्यात हिंदी भाषा सक्तीच्या नवीन शिक्षण धोरणाच्या विषयावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सर्वांनी मराठी आणि आपल्या देशातील इतर भाषा शिकायला हव्यात. देशात एक संपर्क भाषा असावी, हा केंद्राचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात सर्वांनी मराठी शिकायला हवीच. परंतु इंग्रजी आणि हिंदी सोबत इतर भाषाही शिकायला हव्यात. महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी यावी तसेच इतर भाषाही त्यांनी अवगत कराव्या.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणामार्फत विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगर क्षेत्रात राबवण्यात येत आहेत. त्यापैकी ३३७.१० किमी मेट्रोचे जाळे प्रस्तावित करण्याचे काम प्राधिकरणामार्फत प्रगतीपथावर आहे. प्राधिकरणाने मेट्रो मार्ग १ (वर्सोवा ते घाटकोपर), २अ (दहीसर पूर्व ते डी. एन. नगर) आणि ७ (गुंदवली ते दहिसर पूर्व) चे काम यशस्वीरित्या पूर्ण केले व या मेट्रो मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत दाखल आहेत. मेट्रो मार्ग ४ (वडाळा ते कासारवडवली), ४अ (कासारवडवली ते गाईमुख), ५ (ठाणे -भिवंडी ते कल्याण), ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्ग), ७अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ CSMIA T२), ९ (दहीसर पूर्व ते मिरा भाईंदर) आणि १२ (कल्याण ते तळोजा) ची कामे प्रगतीपथावर आहेत.
प्राधिकारणामार्फत मुंबई महानगर प्रदेशामध्ये मेट्रो मार्ग ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) पर्यंतची रेडलाईन सुरु करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा विस्तार हा मेट्रो मार्ग ७अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) असा आहे. मेट्रो मार्ग ७अ हा गुंदवली मेट्रो स्थानकापासून उन्नत मार्गाद्वारे, पश्चिम द्रुतगती मार्ग व सहार उन्नत मार्गाच्या समांतर जातो. मेट्रो मार्ग ७ ची एकूण लांबी ३.४ किमी आहे. ही मेट्रो जोडणी ही मुंबई महानगर प्रदेशातील एकूण मेट्रो जाळ्यासाठी महत्वाचा टप्पा आहे.
