विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “ही वेळ देशांतर्गत राजकीय आरोप-प्रत्यारोपांची नाही, तर दहशतवादाच्या मुळावर घाव घालण्याची आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत थरूर यांनी केंद्र सरकारवर आरोप करणाऱ्यांना सुनावले आहे.
( This is not the time for domestic accusations and counteraccusationsShashi Tharoor tells the opposition)
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांनी भावनिक आणि स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “देशांतर्गत दोषारोपांपेक्षा आता इस्लामी दहशतवादी आणि पाकिस्तानातील त्यांच्या सूत्रधारांचा संपूर्ण नायनाट करणं गरजेचं आहे. निष्पाप नागरिकांच्या हत्येला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”
थरूर म्हणाले की, “पहलगाम हल्ल्याचे उद्दिष्ट स्पष्ट आहे. शांतीचे प्रयत्न थांबवणे, सामान्य स्थितीला खंडित करणे, पर्यटन उद्ध्वस्त करणे, काश्मीरची अर्थव्यवस्था कोलमडवणे आणि त्यामुळे देशभरात काश्मिरींविषयी अविश्वास निर्माण करणे. या सगळ्याचा फायदा कोणाला होतो? फक्त आणि फक्त पाकिस्तानातील कट्टर इस्लामी शक्तींना.”
थरूर यांनी लेखातील उतारा शेअर करत म्हटलं की, “जे घडलं त्याला सामान्य काश्मिरी जबाबदार नाहीत. जर आपण दुःख आणि संतापाच्या भरात त्यांना दूर लोटलं, तर आपण दहशतवाद्यांच्या हेतूंनाच मदत करतो. एखाद्या संपूर्ण समाजाविरुद्ध रोष बाळगणं ही त्यांच्या अजेंड्याला चालना देणारी गोष्ट ठरेल.”
थरूर यांनी सांगितले की, “या दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी सरकार जे काही योग्य समजेल ती पावलं उचलावी आणि आपण सर्वांनी त्याला पाठिंबा द्यावा. या क्रूर हल्ल्यानंतरही आपली भूमिका संयमित, उदारमतवादी आणि सर्वसमावेशक असावी. आपल्याला काश्मीरमध्ये पुन्हा पर्यटन, विकास आणि सामान्य जीवनशैली रुजवायची आहे. काश्मिरी एकात्मतेबाबत भारताची कटिबद्धता ढळू द्यायची नाही.”l आपण शोकात असलो तरी त्यातही आपण आपली सर्वोत्तम मूल्यं जपली पाहिजेत – न्यायप्रियता, समावेशकता आणि सर्व घटकांसाठी चांगले जीवन निर्माण करण्याचा निर्धार. हिंदू असो वा मुस्लिम, काश्मिरी असो वा इतर भारतीय सर्वांसाठी आपण उभे राहिले पाहिजे. मारेकऱ्यांना जिंकू देऊ नका.”
दरम्यान, काँग्रेस वर्किंग कमिटीनेदेखील पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानप्रेरित भ्याड कारस्थान म्हटलं असून, तो भारतीय प्रजासत्ताकाच्या मूल्यांवर थेट आघात असल्याचं म्हटलं आहे. मात्र याच वेळी, भाजपने या घटनेचा वापर देशात तणाव निर्माण करण्यासाठी केल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
