विशेष प्रतिनिधी
मुंबई : नागपूरकर जनतेसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरावा अशी अप्रतिम भेट महायुती सरकारने दिली आहे. मराठा साम्राज्याचे तेजस्वी सेनापती आणि नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनमधून परत आणण्यात महाराष्ट्र सरकारला मोठे यश मिळाले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी ही माहिती दिली.
ही तलवार लंडनमधील लिलावात विक्रीस निघाली होती. ही बाब कळताच सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीने चर्चा करून सरकारकडून तलवार परत आणण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशांनुसार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांना ही जबाबदारी देण्यात आली. भारत सरकारच्या लंडनमधील दूतावासाशी समन्वय साधून आणि मध्यस्थाची नियुक्ती करून राज्य सरकारने लिलावात सहभाग घेतला आणि अखेर तो जिंकत ही ऐतिहासिक तलवार परत मिळवली. यासाठी लिलाव रक्कम, हाताळणी, वाहतूक आणि विमा यांचा एकूण खर्च सुमारे ४७.१५ लाख रुपये इतका अपेक्षित आहे.
रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील प्रमुख मराठा सरदार होते. त्यांच्या युद्धकौशल्यामुळे शाहूंनी त्यांना “सेनासाहिबसुभा” ही मानाची पदवी बहाल केली होती. त्यांनी १७४५ आणि १७५५ मध्ये बंगालच्या नवाबांविरुद्ध मोहिमा राबवून मराठा साम्राज्याचा विस्तार पूर्वेकडील बंगाल, ओडिशा आणि दक्षिणेतील कुड्डाप्पा, कर्नूल पर्यंत केला. त्यांचे राज्य चांदा, छत्तीसगड, संबळपूर या भागांमध्येही विस्तारले होते.
१८१७ साली नागपूरच्या सीताबर्डी लढाईत ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांवर विजय मिळवला होता. या पराभवानंतर भोसल्यांच्या खजिन्याची लूट झाली. त्यात ही तलवारही इंग्रजांच्या ताब्यात गेली असण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात.
ही तलवार मराठा शैलीतील ‘फिरंग’ पद्धतीची असून ती सरळ, एकधारी पात्याची आहे. पात्याच्या मुळाशी सोन्याने कोरलेली “श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग” ही देवनागरीत शिलालेख आहे. पाते युरोपीय बनावटीचे असून त्या कंपनीचे नावही कोरलेले आहे. तलवारीची मूठ मुल्हेरी घाटाची असून त्यावरही सोन्याच्या पाण्याने कोफ्तगरी नक्षीकाम आहे. तलवारीच्या मुसुमेला हिरव्या कापडाचे आवरण आहे, जे तिच्या जतनाबाबतची काळजी दर्शवते.
या यशस्वी प्रयत्नाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे विशेष आभार मानले आहेत. शेलार म्हणाले, “हे सरकार केवळ वर्तमानात गुंतलेले नाही, तर आपल्या गौरवशाली भूतकाळाशी नाते जोडण्याचे कामही करत आहे. ही तलवार नागपूरच्या मातीचा गौरव वाढवणारी आहे.”
