एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर निवडणुकीत पाडतोच, अजित पवार म्हणाले मी शब्दांचा पक्का

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुरंदर विधानसभा मतदारसंघात २०१९ साली झालेल्या निवडणुकीत तू निवडून कसा येतो असा विजय शिवतारे यांना अजित पवारांनी दिलेला दम चांगलाच गाजला होता. मी शब्दांचा पक्का आहे सांगताना एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर निवडणुकीत पाडतोच असे पुन्हा एकदा अजित पवारांनी म्हटले आहे. ( When I say I want to remove the thornI always defeat it in the electionsAjit Pawar said I am true to my words)

पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुक्यात छत्रपती सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जय भवानी पॅनलच्या प्रचारार्थ अकोले येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, मी एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर काढतो. मी निवडणुकीत पाडतो; पण एखाद्याला खासदार करायचा म्हटल्यावर करतो; पण तसा तुमच्या शब्दाचा पक्का आहे. पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असा शब्द देतो असे म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, खडकवासला कालव्यावरील शेतकऱ्यांना प्रत्येकवेळी पाणी संकटाला सामोरे जावे लागत असल्याने नाराजी वाढत चालली आहे. मात्र, पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याचे नियोजन करण्यात येते. पाणी टेल टू हेड कमी पडत असल्याने मुळशी धरणातून पाणी खडकवासला कालव्याला देण्याचा विचार असून त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. खडकवासला कालव्यातून ११०० क्युसेकनी सोडलेले पाणी टेलपर्यंत म्हणजेच इंदापूरपर्यंत २३० क्युसेकनी पोहोचते. यामुळे पाणी गळती रोखून भविष्यात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी बचत करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे.