पांडुरंगाच्या इच्छेने एकत्र येऊ विधान भोवले, अमोल मिटकरी यांना तटकरे यांनी चांगलेच झापले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांवर प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ‘पांडुरंगाच्या इच्छेने एकत्र येऊ’ असे वक्तव्य केले होते. ते त्यांना चांगलेच भोवले असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यावरून चांगले झापले आहे. ( Sunil Tatkare slapped Amol Mitkari on NCP merger)

सुनील तटकरे यांनी आषाढी वारी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येऊ शकतात असे विधान केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. मात्रहे विधान पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून फारसं पचनी न पडल्याचं स्पष्ट झालं आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी थेट इशारा देत मिटकरींना बोलताना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे.

सुनील तटकरे म्हणाले की, अमोल मिटकरींना सल्ला आहे की त्यांनी वक्तव्य जपून करावे. ते पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यामुळे पक्षाची भूमिका एकदा मांडल्यानंतर पुन्हा त्यावर बोलण्याची गरज नाही, असे तटकरे यांनी ठणकावून सांगितले.
सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, आम्ही राज्यात महायुतीत आहोत. देशात एनडीएत आहोत. हा आमचा ठाम निर्णय आहे आणि त्यात जराही बदल होणार नाही. ते पुढे म्हणाले, कोणाला यायचं असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा, पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.

एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय कुणा एकट्याने घेतलेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. “अजितदादा, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि मी – आम्हा सगळ्यांनी मिळून एकमताने हा निर्णय घेतला. राज्यातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, असे तटकरे म्हणाले.

राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालांवर संशय व्यक्त केल्यावर तटकरे यांनी जोरदार पलटवार केला. लोकसभेच्या निकालांवरून त्यांनी पाच मुख्यमंत्री, 40 ते 50 मंत्री जाहीर केले होते. पण जनतेने विधानसभेत त्यांना चपराक दिली असं म्हणत त्यांनी टोला लगावला. त्यांना यश मिळालं की ते म्हणतात कर्तृत्व, आणि आम्हाला मिळालं की लगेच ईव्हीएमवर संशय! हे सरळ दुटप्पी धोरण आहे.