विशेष प्रतिनिधी
वसई : विधानसभा निवडणुकीतील परिवर्तनाप्रमाणे महानगरपालिका निवडणुकांमध्येही परिवर्तन घडवावे लागणार आहे. या भागातील परिवर्तनाची गुरुकिल्ली महानगरपालिकेत आहे. जोपर्यंत महानगरपालिकेत सत्ता येत नाही, तोपर्यंत पाहिलेली स्वप्ने साकार होणार नाहीत. त्यामुळे पूर्ण ताकदीने तयारी करा आणि परिवर्तन घडवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ( Like the assembly elections the municipal elections should also be transformed the Chief Minister appealed in Vasai)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वसई, पालघर येथे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या ‘भाजपा जनसंपर्क कार्यालया’चे उदघाटन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, वसई येथे भाजपा जनसंपर्क कार्यालय सुरू झाल्याचा विशेष आनंद आहे. भाजपातील प्रत्येक आमदाराने जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेत राहून काम करायला हवे. भाजपा जनसंपर्क कार्यालय हे जनतेकरिता हक्काचे ठिकाण असायला हवे. या कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण झाले पाहिजे. स्नेहाताईंच्या या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य होईल.
पालघर जिल्हा आणि वसई विरार महानगरपालिका हा मुंबईचा विस्तारित भाग आहे. गेल्या काही वर्षात या भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे. परंतु ज्या वेगाने लोकवस्ती वाढली त्या प्रमाणात नागरी सोयी-सुविधा वाढू शकल्या नाहीत. येथे योग्य नागरी व्यवस्थापन झाले असते तर मुंबईच्या आसपासच्या महानगरपालिकांप्रमाणे येथेही सुनियोजित महानगरपालिका झाली असती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वसईला छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा इतिहास आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. संघर्षशील स्नेहाताईंच्या नेतृत्त्वात आपल्याला परिवर्तन घडवायचे आहे. येत्या 5 वर्षांत गेल्या 20 वर्षांचा बॅकलॉग भरून काढायचा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मंत्री गणेश नाईक, खा. डॉ हेमंत सवरा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, आ. निरंजन डावखरे, आ. राजन नाईक, माजी आ. विवेक पंडित, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
