विशेष प्रतिनिधी
पुणे: भारतीय भाषांचा तिरस्कार करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा केवळ दोन भाषांचा आग्रहही योग्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
( Hatred of Indian languages is wrongInsistence on only two languages is wrongChief Minister Devendra Fadnavis clear stand)
पिंपरी-चिंचवड येथील संतपीठाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नवा शैक्षणिक धोरण (NEP) आणि भाषाविषयक मुद्यांवर सविस्तर भूमिका मांडली.फडणवीस म्हणाले, “आपण सगळे इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांकडे दुर्लक्ष करतो, हे अयोग्य आहे. राज ठाकरे यांचा केवळ दोन भाषांपुरता आग्रह चुकीचा आहे. संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत तीन भाषांचे सूत्र आहे, तर महाराष्ट्र याला अपवाद ठरू शकत नाही.”
मुख्यमंत्री म्हणाले की, “राज ठाकरेंशी यावर माझी चर्चा झाली आहे. मी त्यांना समजावले की, तीन भाषांचे धोरण केंद्र सरकारने तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर तयार केले आहे. यावर तीन वर्षे चर्चा झाली, हरकती मागवण्यात आल्या आणि त्यानंतरच अंतिम स्वरूप दिले गेले. तामिळनाडूनेही या धोरणाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते, पण न्यायालयाने त्यांचे म्हणणे फेटाळले.”
ते प म्हणाले, “कोणतीही अतिरिक्त भाषा शिकण्यात वाईट काहीच नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने मातृभाषेसोबत इतर भारतीय भाषा शिकल्या, तर त्यांना अधिक व्यापक ज्ञानसंपदा प्राप्त होते. नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठीसारख्या भाषांना ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.”
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने याआधी हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केलं होतं. मात्र आता ती अट रद्द करण्यात आली असून कोणतीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून निवडता येते. यासाठी कमीत कमी २० विद्यार्थी असल्यास शिक्षकही उपलब्ध करून दिले जातील किंवा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देता येईल.
नव्या धोरणामुळे मराठीतून इंजिनिअरिंग, वैद्यकीय आणि एमबीएसारखे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. यामुळे मराठी ही ज्ञानभाषा, अर्थकारणाची भाषा आणि जागतिक संवादासाठी उपयुक्त अशी भाषा ठरण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर यांच्याबाबतही फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “बडगुजर यांच्यावर पूर्वी काही आरोप झाले होते आणि नेते टीकाही करत होते. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशी झाली आणि कोणतीही कारवाई झाली नाही. आता ते भाजपमध्ये आले आहेत, त्यामुळे पक्षाच्या धोरणांनुसार त्यांनी वागले पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे.”
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला कोणताही विरोध नव्हता. केवळ कम्युनिकेशन गॅपमुळे काही गैरसमज झाले असावेत. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश पार पडला असून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनाही त्यानंतर सर्व माहिती देण्यात आली.
