भारतीय मुत्सदेगिरीचे यश, इराणने भारताला अपवाद करत हवाई मार्ग उघडल्याने १,००० भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इजरायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत भारतासाठी अपवादात्मक निर्णय घेतला आहे. भारत सरकारने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंधू’ मोहिमेअंतर्गत, सुमारे १,००० भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधून भारतात परत आणण्यासाठी हवाई क्षेत्र भारतासाठी खुले केले आहे. ( Success of Indian diplomacy Iran opens airspace with exception for Indiapaving the way for the release of 1000 Indian students)

वैद्यकीय शिक्षण घेत असलेले अनेक भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले होते. संघर्षाच्या तीव्रतेमुळे हवाई मार्ग बंद करण्यात आले होते, मात्र भारताच्या विनंतीनंतर इरmराणने भारतासाठी अपवाद करत चार्टर्ड फ्लाइट्ससाठी परवानगी दिली. परिणामी, मशहद आणि तेहरान येथून विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याआधी, ११० विद्यार्थ्यांना रस्ते मार्गाने आर्मेनियातील येरवॉन शहरात नेऊन तेथून विमानाने दिल्लीला आणण्यात आले होते. आता ‘ऑपरेशन सिंधू’चा दुसरा टप्पा सुरू होत असून, उर्वरित सुमारे ९०० विद्यार्थ्यांना हवेमार्गाने परत आणले जाणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात म्हटले आहे की, “भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो. स्थानिक अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.” भारतीय वायुदल आणि नागरी उड्डाण मंत्रालय यांच्या संयुक्त समन्वयातून ही मोहीम राबवली जात आहे.

संघर्षग्रस्त भागांमध्ये विशेषतः मशहद, कूम आणि तेहरानमध्ये तणावाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कमी धोका असलेल्या भागांमध्ये हलवण्यात आले असून, तिथून त्यांना विमानसेवेने भारतात परत आणले जात आहे. भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासन यांच्याद्वारे सातत्याने विद्यार्थ्यांशी संपर्क साधला जात आहे.