विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात पासपोर्टची वाढती मागणी आणि नागरिकांची सोय लक्षात घेता, केंद्र सरकारने ‘पासपोर्ट सेवा 2.0’ हा आधुनिक उपक्रम सुरू केला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.या उपक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या पासपोर्टसाठी अर्ज करता यावा यासाठी प्रक्रिया अधिक डिजिटल करण्यात आली आहे.
( Passport Seva 2.0 launched with e-passportnow police verification will be done in just five to seven days)
नव्या प्रणालीमुळे दस्तऐवजांची देवाणघेवाण, अर्ज सादर करणे आणि पोलीस पडताळणी आदी टप्पे सहजतेने पार करता येणार आहेत. विशेष म्हणजे आता सरकारकडून ई-पासपोर्ट देखील जारी केला जात आहे. हा पासपोर्ट सामान्य पासपोर्टसारखाच असतो, मात्र त्यामध्ये एक सुरक्षित इलेक्ट्रॉनिक चिप बसवलेली असते. ही चिप पूर्णपणे टेम्पर-प्रूफ असून, पासपोर्टधारकाची वैयक्तिक व बायोमेट्रिक माहिती सुरक्षितपणे साठवलेली असते. ही चिप आयसीएओच्या (ICAO) आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आली आहे, त्यामुळे ई-पासपोर्ट जगभरात वैध मानला जातो.
ई-पासपोर्टमुळे प्रवासात अनेक सोयी होणार आहेत. विमानतळावर चेक-इन किंवा इमिग्रेशनसाठी कमी वेळ लागेल, कारण माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याने अधिकाऱ्यांना ते तत्काळ पडताळता येते. शिवाय, फसवणुकीचा धोका कमी होतो कारण चिपमध्ये संग्रहित माहिती बदलता येत नाही. भारतात सध्या टप्प्याटप्प्याने ई-पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात झाली असून, लवकरच ही सेवा संपूर्ण देशभरात उपलब्ध होणार आहे.
दुसरीकडे, पासपोर्ट प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन. विशेषतः ग्रामीण किंवा दुर्गम भागातील नागरिकांना या टप्प्यासाठी महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागत असे. ही अडचण दूर करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने mPassport Police App सुरू केले आहे. या अॅपच्या मदतीने स्थानिक पोलीस अधिकारी अर्ज, दस्तऐवज आणि माहिती तपासून ५ ते ७ दिवसांत पोलीस पडताळणी पूर्ण करू शकतात. यामुळे पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया आणखी जलद व सुलभ झाली आहे.
