विशेष प्रतिनिधी
भंडारा : मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी, जनतेला सोन्याचे दिवस दाखवले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना जनतेनेच आता त्यांच्या जागेवर बसवले अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ( The people showed space to those who trampled on Balasahebs thoughts Deputy Chief Minister Eknath Shindes attack on Uddhav Thackeray)
भंडाऱ्यात झालेल्या जाहीर सभेत बोलताना शिंदे म्हणाले, शिवसेना हा कुणा एकट्याचा मालकी हक्काचा पक्ष नाही. ही शिवसेना सामान्य शिवसैनिकांची, विचारांशी प्रामाणिक राहणाऱ्यांची आहे. जो कोणी बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेला, त्याला जनतेने योग्य उत्तर दिलं आहे. वाघाच्या कातडीवरून कोणी वाघ बनत नाही, हे भंडाऱ्यातील निकालांनी दाखवून दिलं आहे. ज्यांना वाटतं की त्यांचा मोठा राजकीय वारसा आहे, त्यांना आता जनतेनेच आरसा दाखवला आहे. जनतेची नजर फार तीव्र आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. जेव्हा मुख्यमंत्री झालो, तेव्हाही कार्यकर्ता होतो आणि आजही तसाच कार्यकर्ता म्हणून काम करतो. हीच माझी ओळख आहे.
एक बार कमिटमेंट कर दी, तो मै अपनी आप की भी नहीं सुनता’ अशा डायलॉगने भाषणाची सुरुवात करत शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे. पण आधी आणि आजही मी एक कार्यकर्ता आहे. राजकारणात व्यासपीठ वैभवाचे असले तरी खरे ऐश्वर्य हे कार्यकर्ते असतात. जे या व्यासपीठावर बसणाऱ्यांना नेता, आमदार, खासदार आणि मंत्री बनवतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे.”
विरोधकांवर हल्लाबोल करत शिंदे म्हणाले की, “पवनी-भंडारा हा वाघांचा जिल्हा आहे. पण याच जिल्ह्यात खरी शिवसेना कोणती, यावरून विरोधकांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी नरेंद्र भोंडेकर यांना निवडून देऊन खरी शिवसेना कोणती हे स्पष्ट केलं आहे. झोपेच्या वळणावर बसलेल्यांना जनतेने घरी बसवले आहे. वाघाच्या कातडीवरून लांडगा कधीच वाघ होत नाही. शिवसेना ही टोमणे सम्राटांची नव्हे तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे. पक्ष हाच खरा वारसा आहे आणि त्यात कार्यकर्त्यांचा सहभाग महत्वाचा आहे.
शिवसैनिकांना आवाहन करताना शिंदे म्हणाले,
भगवा म्हणजे एक विचार, भगवा म्हणजे झंझावात, भगवा म्हणजे तलवारीची धार आणि भगवा म्हणजे जिजाऊंचा आशीर्वाद. विधानसभा निवडणुकीत भगवा फडकवला तसा, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भगवा फडकवायचा आहे.
