विशेष प्रतिनिधी
अक्कलकोट : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करुन त्यांच्या तोंडावर काळे फासण्यात आले. अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड गेले असता ही घटना घडली .
( Ink was thrown at Sambhaji Brigade state president Praveen Gaikwad in Akkalkot)
संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे असे कारण देत प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत शाईफेक केली. त्याचसोबत स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केल्याचा देखील राग कार्यकर्त्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते.
प्रवीण गायकवाड यांचा आज अक्कलकोटमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार समारंभ सुरु असताना कार्यक्रम ठिकाणीच त्यांना काळं फासण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ही शाईफेक केल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीचे नेते म्हणून ओळखले जातात. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या प्रवीण गायकवाड यांनी मधल्या काळात शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला होता. मात्र, शेकापमधून बाहेर पडून, ते पुन्हा संभाजी ब्रिगेडचे संघटनात्मक काम करत आहेत.
या भ्याड कृत्यामागील मास्टरमाईंडचाही पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेचा निषेध करताना म्हटले आहे की, बहुजन समाजात अनेक उद्योगपती घडवणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करणाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध.शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार समाजात रुजवण्याचं खूप मोठं कार्य प्रविणदादा गायकवाड यांच्या हातून होत आहे. अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलं म्हणून तर समाजकंटकांनी त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं नाही ना? याचाही तपास झाला पाहिजे. तसंच हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे हे उघड आहे. आम्ही सर्वजण प्रविणदादा गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत.
