विशेष प्रतिनिधी
जुन्नर : मराठा समाजाच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा, हेच तुमचे उपकार मराठा समाज कधीही विसरणार नाही, असा शब्द मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघालेल्या आपल्या आंदोलनादरम्यान गुरुवारी सकाळी ते शिवनेरी किल्ल्यावर पोहोचले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “शिवनेरी आणि रायगड आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. आज मराठा समाज प्रचंड वेदनांमधून जात आहे, या वेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यायला हव्यात. समाजातील लेकरांच्या यातनांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी सरकारची साथ मिळावी लागेल.”
( The Maratha community will never forget your kindness throughout their livesManoj Jaranges words to the Chief Minister)
ते पुढे म्हणाले, “फडणवीस कुणाला अडवणार नाहीत. न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे आम्ही परवानगी घेऊन आंदोलन करतो आहोत. पण केवळ एका दिवसाची परवानगी ही आमच्या भावनांचा अपमान आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देता आली असती, पण जाणूनबुजून एक दिवसाची मर्यादा घातली गेली.”
मुख्यमंत्र्यांना उद्देशून जरांगे म्हणाले, “फडणवीसांकडे अजूनही योग्य संधी आहे. या संधीचं सोनं करा. तुम्ही आमचे शत्रू नाही, फक्त मराठाविरोधी भूमिका सोडा. मी शिवनेरीच्या पायथ्यावरून स्पष्ट सांगतो, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा. हेच मराठे तुमचे उपकार कधीही विसरणार नाहीत, हा आमचा शब्द आहे.”
