भारतातील मोठे व्यावसायिक गौतम अदानी यांनी हिंडनबर्ग रिपोर्टवर आपलं मत मांडलं आहे. अमेरिकेतील शॉर्ट-सेलर कंपनी असलेल्या हिंडनबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये अदानी समूहावर ताशेरे ओढले होते. यामुळे अदानींच्या कंपनीच्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणात कोसळली होती. मंगळवारी अदानी एंटरप्रायझेसच्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना, अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांनी याबाबत आपलं मत मांडलं. “हा रिपोर्ट आपल्या कंपनीची बदनामी करण्यासाठी देण्यात आला होता. यामधील माहिती आणि आरोप चुकीचे होते. आपल्या कंपनीची रेप्युटेशन खराब करून त्यामार्फत नफा कमावण्याचं उद्दिष्ट या कंपनीचं होतं”, असं अदानी म्हणाले.
गौतम अदानी म्हणाले की अमेरिकन शॉर्ट सेलरने जाणीवपूर्वक कंपनीची बदनामी करण्याच्या हेतूने अहवाल प्रसिद्ध केला, जेणेकरून कंपनीचे नुकसान होईल. कंपनीचे शेअर्स पडतील आणि जाणूनबुजून त्यांना नफा कमावता येईल. हिंडेनबर्गने प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी एका सुनियोजित कटाचा भाग म्हणून आपला अहवाल प्रसिद्ध केला, जेव्हा अदानी समूह इतिहासातील सर्वात मोठा एफपीओ आणण्याच्या तयारीत होता. हिंडेनबर्गचा खरा हेतू कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे आणि त्याचे शेअर्स खाली आणण्याचा होता.
हिंडेनबर्गचा अहवालाच्या पाच महिन्यानंतर गौतम अदानी आता उघडपणे सर्वांसमोर आले आहेत. पूर्ण सबस्क्राईब होऊनही आम्ही एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला जेणेकरून गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण होईल, असे अदानी म्हणाले. अहवाल समोर येताच त्यांनी तो फेटाळला तरीही विविध बातम्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या अफवा, कथा पसरवण्यात आल्या, त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले, त्यांनी पुढे म्हटले.
हिंडेनबर्गनं आपल्या घृणास्पद अहवालात अदानी समूहावर खात्यातील फसवणूक आणि स्टॉक व्हॅल्यूमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. यामुळे, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, ज्यामुळे समूहाचे बाजार मूल्य नीचांकी पातळीवर पोहोचले आणि ते सुमारे 145 अब्ज डॉलर्सनी घसरलं होतं.
