प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांची अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांच्या गटाने काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत बच्चू कडू यांची अध्यक्षपदी तर अभिजीत ढेपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. या विजयानंतर बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. बच्चू कडूंना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली आहे.
आज झालेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत बच्चू कडू गटातर्फे बच्चू कडू स्वतः अध्यक्षपदासाठी तर सहकारातील नेते अभिजीत ढेपे हे उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात होते. बच्चू कडू आणि अभिजीत ढेपे या दोघांनाही 11-11 मते मिळाली तर काँग्रेसचे यशोमती ठाकुर आणि बबलू देशमुख गटाचे उमेदवार माजी आमदार विरेंद्र जगताप आणि हरिभाऊ मोहोळ या दोघांनाही 10-10 मते मिळाली.काँग्रेसची या निवडणुकीत 3 मते फुटली. हे तिन्ही मतं बच्चू कडू यांच्याकडे वळवली गेली, त्यामुळे माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या गटाला हा जबर धक्का असल्याचे बोलल्या जात आहे.
काँग्रेसचे संख्याबळ मोठ्या प्रमाणावर असतांनाही बच्चू कडू यांनी खेळी करून हा विजय मिळवला आहे. हा आमदार यशोमती ठाकूर व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. कारण अमरावती जिल्हा हा काँग्रेसचा गड समजला जातो.या निवडणुकीत आम्ही सहा-सात जण अतिशय मजबूत होतो. त्यामुळेच हा विजय खेचून आणला आहे. शेतकऱ्यांबाबत असलेल्या चांगल्या भावना आणि पुण्य कर्म आमच्या कामी आले आहेत. या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं अर्थकारण कसं मजबूत होईल. शेतकऱ्यांना कर्जासाठी वणवण फिरावं लागणार नाही. त्यांच्या दारापर्यंत आम्हाला कसं जाता येईल, हा निश्चित प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची एक हाती सत्ता होती. शेतकऱ्यांना व संचालकांना त्रास देणाऱ्या हुकूमशहांची हुकूमशाही संपवली आणि जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दारी घेऊन जाणार ,अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
