उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना, मिळणार शासकीय अतिथीचा विशेष दर्जा

जपान सरकारच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या जपानला दौऱ्यावर आहेत, महाराष्ट्र आणि जपानच्या मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) कडून मोठय़ा प्रमाणावर अर्थसहाय्य मिळवून विविध प्रकल्प मार्गी लावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

या दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्याही ते या दौर्‍यात भेटी घेणार असून, जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनाही ते भेटतील. जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय! राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठका सुद्धा होणार आहेत. जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला सुद्धा या दौर्‍यात ते भेटी देणार आहेत. 20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत आयोजित या दौर्‍यात त्यांचे भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत. आपल्या या दौर्‍यात वाकायामा या शहराला सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.

राज्यात 2014 मध्ये त्यांच्या नेतृत्त्वात सरकार आल्यावर सप्टेंबर 2015 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जपानचा दौरा केला होता. त्या दौर्‍यात ओसाका प्रांताला भेट दिली होती. जायकासोबत चर्चा केली होती. याकोहामा पोर्टला भेट दिली होती तसेच तेथील अनेक मंत्र्यांशी बैठका झाल्या होत्या.जायकासोबत विविध प्रकल्पांसाठी चर्चेनंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना जायकाने वित्तपुरवठा केला. यात मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन, मेट्रो-3, नागपूर नागनदी शुद्धीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच भेटीनंतर 2017 मध्ये जायकासोबत एमटीएचएलसाठी करार झाला होता.

तर राज्यातून अनेक प्रकल्प गेल्याची टीका वारंवार विरोधक करत असतात. दरम्यान या दौऱ्यावेळी देवेंद्र फडणवीस अनेक गुंतवणूकदारांना ते भेटणार आहेत. या भेटींचा राज्याला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.