‘एमएमआरडीए’कडून गिरणी कामगारांसाठी म्हाडाला मिळणाऱ्या दोन हजार 521 घरांची सोडत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील रांजगोळी, रायचूर आणि रायगड जिल्ह्यातील कोल्हे भागातून मिळणाऱ्या घरांचा त्यात समावेश आहे. मुंबई मंडळातर्फे 2020 मधील या दोन्ही मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील 131 यशस्वी पात्र कामगार, वारसांना गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी मंगळवारी वांद्रेतील म्हाडा मुख्यालयात घरांच्या चावी सुपूर्द केल्या. त्यावेळी त्यांनी नव्या सोडतीबाबत माहिती दिली.
सद्यस्थितीला रांजगोळी येथे असणाऱ्या घरांती दुरूस्तीकामं हाती घेण्यात आली असून, येत्या तीन महिन्यांमध्ये ही कामं पूर्णत्वास जातील आणि त्यानंतर गिरणी कामगारांनाच केंद्रस्थानी ठेवक म्हाडा आणि कामगार विभाग अर्ज छाननी आणि पात्र अर्जांची यादी तयार करण्यावर भर देतील. प्राथमिक स्तरावर उपलब्ध घरं गिरणी कामगारांना पुरवली जात असतानाच काही कामगारांच्या मागणीनुसार त्यांना पश्चिम महाराष्ट्रातही घरं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन विचाराधीन असल्याचं संबंधित यंत्रणांमधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईतील बंद पडलेल्या 58 गिरण्यांच्या जागेवरील घरांच्या प्रकल्पात गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी सुमारे एक लाख ७४ हजार कामगार, वारसांनी अर्ज केले आहेत. त्यातील 10 हजार 701 गिरणी कामगारांना घरांचे वितरण करण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या सोडतीतील यशस्वी अर्जदार, दुबार अर्जदारांचे अर्ज वगळून ही संख्या एक लाख 50 हजार 484 इतकी आहे. 2020मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील तीन हजार 38 पैकी 856 यशस्वी पात्र गिरणी कामगार, वारसांना तीन टप्प्यात घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत.
म्हाडा आणि गिरणी कामगारांच्या घरांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असतानाच तिथे सिडकोच्या घरांच्या किमती कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सिडकोत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. सिडकोनं काही योजनांच्या घरांच्या किंमती तब्बल 9 लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. उलवे नॉडमधील बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानक परिसरातील घरांच्या किंमती तब्बल 9 लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सिडकोनं घेतला आहे.
