गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानं भगिनींना दिलासा, त्यांचे जीवन अधिक सुकर होईल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सर्व एलपीजी ग्राहकांसाठी म्हणजेच 33 कोटी गॅस जोडण्यांसाठी एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. रक्षाबंधन हा सण आपल्या कुटुंबातील आनंद द्विगुणीत करणारा दिवस असतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.पीएम उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात सिलिंडरमागे 200 रुपयांचे अनुदान मिळत राहील. सरकारने 75 लाख अतिरिक्त पीएम उज्ज्वला जोडण्यांना देखील मंजुरी दिली आहे, यामुळे एकूण पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींची संख्या 10.35 कोटींपर्यंत पोहोचणार आहे.

उज्ज्वला योजनेंतर्गत यापूर्वी 200 रुपये अनुदान होते, तर आजपासून त्यावर 200 रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाचा लाभ मिळणार असल्याची माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. म्हणजेच आता उज्ज्वला योजनेत येणाऱ्यांना 400 रुपये अनुदान मिळणार आहे. 33 कोटी लोकांकडे गॅस सिलेंडर कनेक्शन आहेत. त्याचबरोबर 75 लाख नवीन कनेक्शन दिले जाणार आहेत. त्यासाठी 7680 कोटी खर्च येणार असल्याचे ठाकूर म्हणाले. उज्ज्वला सिलेंडरसाठी केंद्र सरकार प्रत्येक कनेक्शनसाठी 3600 रुपये खर्च करत असून आतापर्यंत 9.60 लाख महिलांना उज्ज्वला सिलेंडरचा लाभ देण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं. आताही यामध्ये 75 लाख नवीन महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिट्विट केलं आहे.मोदी लिहितात, “रक्षाबंधन हा सण आपल्या कुटुंबातील आनंद द्विगुणित करणारा दिवस असतो. गॅसच्या किमती कमी झाल्यामुळे माझ्या कुटुंबातील भगिनींना दिलासा मिळेल आणि त्यांचे जीवन अधिक सुकर होईल. माझी प्रत्येक बहीण आनंदी, निरोगी, सुखी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

200 रुपये प्रति सिलिंडरच्या अतिरिक्त सबसिडीला मान्यता देण्यात आली आहे, परंतु सबसिडीचा भार केवळ ऑइल मार्केटिंग कंपन्यांवर (OMCs) पडणार नाही. या अनुदानाचा भारही सरकार उचलणार आहे. सरकारवर किती बोजा पडेल आणि ओएमसीवर किती बोजा पडेल, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण किमती कमी करण्याच्या निर्णयामुळे सरकारवर 7500 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे समजतेय.