पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार; निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

भारतीय निवडणूक आयोग सोमवारी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या सर्व विधानसभांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपत आहे. त्यामुळे आता निवडणुका घेण्याची घोषणा निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाच्या निवडणुका या लोकसभेबरोबरच होणार असल्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. कारण आज दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत या पाच राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. साधारण नोव्हेंबरचा दुसरा आठवडा किंवा डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांचे वेळापत्रक काय असणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरकार मध्य प्रदेशात आहे. तर, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. मिझोरममध्ये मिजो नॅशनल फ्रंट आणि तेलंगाणात भारत राष्ट्र समिती म्हणजे बीआरएस सत्तेत आहे. पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या लोकसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या सेमीफायनल म्हणून ओळखल्या जात आहेत.

मध्य प्रदेशातील 230, राजस्थानमधील 200, तेलंगणातील 119, छत्तीसगडमधील 90 आणि मिझोराममधील 40 विधानसभा जागांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ या वर्षी 17 डिसेंबर रोजी संपत आहे. तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे.