शिवाजी पार्कावर दसरा मेळावा हा एकनाथ शिंदे यांचाच होणार, एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांमुळेच आज शिवसेना टिकून आहे. असे वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी केले. लघुउद्योग भारती संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबई (विलेपार्ले) येथे होत आहे. त्यात राज्यभरातून लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागात लघुउद्योगांना चालना देण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जातेय. त्यात उद्योजक आपल्या विविध समस्या मांडतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे हे अधिवेशन होऊ शकले नव्हते. या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले.

मागील निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र लढली होती. पण उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. गद्दारी करणे हे त्यांच्या रक्तात आहे, म्हणून ते सारखं गद्दार गद्दार म्हणत आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यांनी साहेबांना साथ दिली म्हणून आज शिवसेना उभी राहिली. ते लोणी आज आदित्य ठाकरे खात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल नारायण राणे यांनी केलाय. असेही ते यावेळी म्हणाले.
आम्हाला उगीच बोलायला लावू नका, मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्या नको त्या गोष्टी सर्व सांगू. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी गप्प बसावे. तुम्ही शिवसैनिकांना काय दिलं? असा प्रश्नही नारायण राणेंनी विचारला. आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला तर काय फरक पडतो? विरोधी पक्षात आहेत, त्यामुळे रस्त्यावर यायला हवं. आदित्य ठाकरेंसाठी मला प्रश्न विचारू नका, तो वेड्यासारखा बडबड करत आहे, असेही नारायण म्हणाले. दरम्यान, शिवाजी पार्कवर शिंदे गटाचाच दसरा मेळावा होईल. कोण फावड्याने शिवाजी पार्क उखडणार? फावडा मातोश्रीवरून आणणार का? असा हल्लाबोल राणे यांनी यावेळी केला. असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांना देखील जोरदार टोला लगावला.
राजकारणात काम करत असताना आमची काही महत्वकांक्षा असते. मी राज्यात अनेक पदे भूषवली आणि केंद्रात गेलो. पण या उद्योजकांना मानलं पाहिजे, जे देश उद्योगात पुढे जाईल या साठी काम करत असतात. अनेक उद्योजक तयार झाले तर बेकारी कमी होईल. देश आयात किती करतो? आणि निर्यातीतून किती मिळत? आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणं यांचे मार्गदर्शन तरुणांना, उद्योजकांना द्यायला हवे, असा सल्ला यावेळी राणेंनी दिला.
