नांदेड घटनेवरून विरोधकांकडून राजकीय सलाईनने राज्यात वणवा पेटवण्याचं काम – चित्रा वाघ

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्ण दगावल्याने राज्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेवरून राजकीय वातावरण देखील तापले असून,अजूनही नेत्यांचे नांदेडच्या रुग्णालयात एकामागून एक दौरे सुरूच आहे. त्यातच आता भाजपच्या महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत, “नांदेड घटनेवरून विरोधक राजकीय सलाईनने राज्यात वणवा पेटवण्याचे काम करत असल्याचे”, चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, आरोग्य हा सरकारचा पहिला प्राधान्यक्रम आहे. घटना घडल्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये आले. एका दिवसात 14 निर्णय घेतले गेले. यामध्ये काय त्रुटी आहे, त्यासंबंधी योग्य निर्णय घेतले गेले. 2800 पदांची भरती मॅटच्या स्टेमुळे थांबली होती तोही मार्ग मोकळा झाला आहे. आज मुख्यमंत्री आरोग्य विभागाशी संवाद साधणार आहेत. त्यासोबतच सीएस, आरोग्य अधिकारी, विभागीय अधिकारी यांची समिती तयार करून आपल्या परिसरातील रुग्णालयाला भेटी देऊन काय कमी आहे याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आयसीयूमध्ये कधीच औषधांचा तुटवडा नव्हता. त्यादिवशी घटना घडली, आम्ही डॉक्टर नाहीत पण रेकॉर्डवरील माहिती देत आहोत. तीन वर्षाच्या रेकॉर्डवरून रुग्ण हे अत्यवस्थेत या ठिकाणी आणले जातात. खाजगीत उपचार संपल्यावर रुग्ण घरी घेऊन जा म्हणून सांगण्यात येतात. त्यावेळी रुग्ण येथे आणतात हे सरकार बदलल्यावर एक वर्षातच हे रुग्ण मृत झाले, असा विरोधी पक्ष सूर लावत आहेत. त्यांना उत्तर देण्याची ही वेळ आणि जागाही नाही. जे इथे येऊन भपारे सोडून गेले ते कोणी डॉक्टर नाहीत माझ्या नंतरही काही महानुभव येणार आहेत, त्यांना मला सांगायचे तुम्ही येताना एका डॉक्टरला घेऊन या तो तुम्हाला नीट सांगू शकेल.या रुग्णालयाची आकडेवारी पाहिली तर 2020 ते 2023 पर्यंत रोज 13 जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे एकच दिवशी असे झाले असं नाही. एकही माणूस दगावला तर आमच्यासाठी दुःखाचीच गोष्ट आहे. परंतु, ज्या पद्धतीने विरोधकांनी स्वतःचे मानसिक आजारपण लोकांना दाखवले त्यांची मला कीव येते, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भंडाऱ्यात दहा बालकांचा जळून मृत्यू झाला होता. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही. अन् आता नांदेडला येऊन सुप्रियाताई सुळे या आरोप करून गेल्या.तुमच्या वेळचे सांगता येत नसले तर तसे सांगा, मी येते सांगायला. तुम्ही सध्या राजकीय सलाईन घेऊन फिरत आहात, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.