मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली असल्याची माहिती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारण्याची शक्यता ही खूप कमी असते पण आता सुप्रीम कोर्टाने पिटीशन स्वीकारल्याने हा एक मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातील आशेचा एक किरण उगवला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन-चेंबर ही सुनावणी पार पडली होती. दरम्यान, यावेळी राज्य सरकारने सुनावणीत आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे, या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्यात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारले जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता न्यायालयाने अखेर आज क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असल्याचं विनोद पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारसाठी आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे.
मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झाले होते. त्याच निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 5 सदस्यांनी याबाबत रीतसर सुनावणी घेऊन मराठा समाजाची आरक्षणाची मागणी फेटाळून लावत मराठा समाजाला आरक्षण देता येणे शक्य नसल्याचे आपल्या आदेशात स्पष्ट केले होते.राज्य शासनाने 2018 साली एसईबीसी कायद्यांतर्गत मराठा समाजाला दिलेले आरक्षण मराठा समाज सामजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. त्यावेळी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये राज्य शासनाने दिलेले आरक्षण या निर्णयामुळे रद्द झाले होते.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याने मराठा आरक्षणाबाबत हा मोठा दिलासा समाजाला जात आहे. तसेच, मराठा आरक्षणाच्या याचिकेवर खुल्या कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता. यामुळे सरकारच्या आशा पल्लवित होतील. सरकारला तात्पुरता दिलासा देखील मिळाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता 24 जानेवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
