ज्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडला, त्यांना लोकशाहीनेच जागा दाखवली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाले असून, यावरून राजकीय वातावरण तापले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येत असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता, त्यांना लोकशाहीने जागा दाखवली आहे, असे म्हणत फडणवीसांनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

हा अपेक्षित निर्णय आहे, कारण मागील अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली, समाजवादी पार्टी संदर्भात जेव्हा वाद उभा राहिला होता किंवा इतर पाच प्रकरणात इलेक्शन कमिशनची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे अस देवेंद्र फडणवीस म्हणाले. “बहुमताने जो निर्णय घेतला जातो तो निर्णय लोकशाहीत महत्वाचा असतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पक्षाचे संविधान आहे. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. मी अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो. अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकार त्यांच्या नेतृत्वात उत्तम काम करेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “बहुमताला महत्व आहेच, केवळ बहुमताच्या आधारावर निर्णय झाला नाही, तर इतर सर्व बाबीचा विचार झाला. वेळोवेळी पार्टीचे संविधान कसं होत? निवडणुका झाल्या की नाही? आता पक्ष कोणाचा आहे? याचा विचार झाला आहे असंही देवेद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान याबाबत ट्वीट करत फडणवीस यांनी अजित पवारांचे अभिनंदन देखील केले आहे, आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे फडणवीस म्हणाले.

२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपा यांची युती होती. हे दोन्ही पक्ष बरोबर लढले होते. मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे या मागणीवर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे ठाम होते. त्यामुळे शिवसेना-भाजप ची युती तुटली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सह हातमिळवणी केली आणि ते मुख्यमंत्री झाले. मात्र अडीच वर्षांनी त्यांच्या पक्षात बंड झालं. तर गेल्यावर्षी अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात बंड करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर ती लढाई निवडणूक आयोगासमोर होती. निवडणूक आयोगाने बहुमताचा आधार ठरवत पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिलं आहे. त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.