वॉटर ग्रीडला निधी आणि अशोक चव्हाणांना भावलेले फडणवीसांचे विकासाचे राजकारण

माजी मुख्यमंत्री आणि कॉग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी कॉग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. अशोक चव्हाण यांची पक्षामध्ये घुसमट होत होती हे खरेच, पण त्यापेक्षाही त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासाचे राजकारण भावले असल्याचे पुढे आले आहे.

अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. केंद्रातही गृहमंत्रीपदाबरोबर अनेक पदे त्यांनी सांभाळली. मराठवाड्याला वरदान ठरलेला जायकवाडी धरण प्रकल्प पूर्ण करण्यात शंकरराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी कायम विकासाची भूमिका ठेवली. मात्र, तरीही मराठवाड्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. यावर उपाययोजना करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या कल्पकतेतून मराठवाडा ग्रीड प्रोजेक्टची सुरूवात केली.

जायकवाडी, उजनी, खडकपूर्णा, येलदरी, मांजरा, लिंबोटी, विष्णुपुरी, सिद्धेश्वर, माजलगाव, निम्न तेरणा, निम्म मनार, इसापूर या प्रमुख धरणांचा ग्रीड प्रकल्पात समावेश आहे. बंद पाइपद्वारे एका धरणातून दुसऱ्या धरणात पाणी वाहून नेले जाणार आहे. त्यामुळे खालच्या राज्यात वाहून जाणारे पाणी राज्यात अडवणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी इस्त्रायल सरकारची कंपनी आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार झाला होता. या करारानुसार तज्ज्ञांनी वर्षभर मराठवाड्यातील पाऊस, सिंचन प्रकल्प आणि भूगर्भातील पाण्याचा अभ्यास केला.

अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील १८३ गावांसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेतून आराखडा आखण्यात आला. मात्र, विरोधी पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघातील काम असल्याचा विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला नाही. त्यांनी या योजनेसाठी ७२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. फडणवीस यांचे हेच विकासाचे राजकारण अशोक चव्हाण यांना भावले. या योजनेला निधी दिल्यापासूनच चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळेच चव्हाण यांनी सरकारविरोधात विनाकारण आंदोलने करणेही टाळले.

महाविकास आघाडीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्य भाजप नेत्यांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याचा आरोप करत महामोर्चा काढण्यात आला. मात्र, अशाेक चव्हाण त्याला उपस्थित राहिले नाहीत. तेव्हापासून कॉग्रेसमधील नेत्यांकडून अशाके चव्हाण यांच्यावर शरसंधान केले जात होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदही त्यांना नाकारण्यात आले. त्यामुळे त्यांची घुसमट होत होतीच. त्यामुळे शेवटी त्यांनी कॉग्रेसचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.